पुणे : पश्चिम पुण्यातील नागरिकांना आज पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राशी जोडलेल्या मुख्य जलवाहिनीवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापालिकेकडून तातडीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे एसएनडीटी आणि चतुःशृंगी जलटाकीमधून पाणी घेणाऱ्या अनेक भागांचा आजचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या दुरुस्तीच्या कामानंतरही परिस्थिती लगेच पूर्ववत होणार नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी संबंधित भागांमध्ये पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयाचा फटका कोथरूड, एरंडवणा, कर्वे रस्ता, पौड रस्ता, लॉ कॉलेज रोड, मयूर कॉलनी, नवसह्याद्री परिसर, औंध, बोपोडी, खडकी, पुणे विद्यापीठ परिसर, सानेवाडी, सकाळनगर, औंधगावसह पश्चिम पुण्यातील अनेक निवासी भागांना बसणार आहे. महापालिकेच्या या दुरुस्तीच्या कामामुळे काही तास गैरसोय होणार असली, तरी भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत ठेवण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


