पावसाच्या खंडाने तिवसा तालुक्यात दुष्काळाचे सावट; हेक्टरी लाखाची मदत, कर्जमाफीची मागणी

पालकमंत्री बावनकुळे शेतकऱ्यांच्या बांधावर; काँग्रेससह प्रहारचा आक्रमक पवित्रा

तिवसा ,राज माहोरे (प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून दडी मारल्याने सोयाबीन, तूर, मूग, कपाशी व संत्रा पिकांसह खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिवसा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

यावेळी विविध संघटनांच्या वतीने पालकमंत्र्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची विशेष मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी, महसुली व पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी तसेच तातडीने पंचनामे करावेत, अशा मागण्या केल्या. दुसरीकडे प्रहारचे संजय देशमुख व योगेश लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. विशेषतः वन्यप्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस धोरण आखावे, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना वारंवार होणाऱ्या नुकसानीपासून कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

वन्यप्राण्यांसह वीज समस्येवरही आक्रमक भूमिका

शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीसोबतच वीज वितरण व्यवस्थेच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे प्रहारच्या निवेदनात नमूद करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्या व यंत्रणेची आवश्यक देखभाल न झाल्याने अनेक ठिकाणी डीबी बॉक्स, एबी स्विच, डीओ तसेच ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचा आरोप करण्यात आला. वाकलेले विद्युत खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने वीज वितरण कंपनीला तातडीने सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तिवसा तालुक्यातील आमले नामक शेतकऱ्याचा विद्युत अपघातात मृत्यू झाल्याचा संदर्भ देत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.

दुष्काळी उपाययोजनांची मागणी

काँग्रेसच्या निवेदनात तिवसा तालुक्याचा दुष्काळ सांख्यिकीच्या वस्तुनिष्ठ निकषांनुसार पहिल्या ट्रिगरमध्ये समाविष्ट करावा, अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त पिकांना हेक्टरी एक लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. “शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त होत असताना शासनाने विलंब न करता तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा,” अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी तालुका काँग्रेसचे विश्वजीत बाखडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे, शशांक राऊत, संजय चौधरी, मनोज डीगांबरे, संदीप हगवणे, गौरव चौधरी, सर्जा वाघमारे, आकाश माहोरे, पुरुषोत्तम मेश्राम, आकाश मकेश्वर, निलेश गुडधे, प्रवीण देशमुख, रवींद्र बनकर, अभिजित साबळे, श्रीधर कोहळे, संदीप वानखडे, रमेश कोहळे, अमोल काळे यांच्यासह शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर प्रहारचे संजय देशमुख व योगेश लोखंडे यांनी आमदार राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री बावनकुळे यांना वन्यप्राणी, वीज वितरण आणि दुष्काळी परिस्थितीबाबत स्वतंत्र निवेदन दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. त्यामुळे आता प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे आणि दुष्काळी उपाययोजनांना कितपत गती मिळते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…