नाशिक : पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून, समाजाला योग्य दिशा देण्याचे आणि राष्ट्रहिताची भावना रुजवण्याचे एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजात काम करताना समन्वयवादी दृष्टिकोन ठेवून राष्ट्रीय विचारांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व संवाद केंद्राचे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केले.
नाशिक येथे आयोजित ‘विश्व संवाद केंद्र, सिंहस्थ कुंभपर्व माध्यम केंद्र’ कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. आगामी सिंहस्थ कुंभपर्व (नाशिक-त्र्यंबकेश्वर) च्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या कार्यविस्तारामुळे या नवीन स्थायी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या भाषणात अभय कुलकर्णी यांनी पत्रकारितेतील मूल्यांवर भर दिला. “सध्याच्या काळात पत्रकारितेचे क्षेत्र वेगाने बदलत असून मूल्यांची आणि नैतिकतेची जपवणूक करणे हे मोठे आव्हान ठरत आहे. पत्रकारांनी आपली वैचारिक आणि सामाजिक नैतिकता ढळू देता कामा नये. सर्वतोपरी राष्ट्रहिताची भावना जोपासून सत्य, तटस्थ आणि विधायक पत्रकारिता केली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
रत्नमनोहर संकुल, अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ, रविवार कारंजा येथे गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर नाशिक विभाग संघचालक (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कैलासनाना साळूंखे, नाशिक शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर, विश्व संवाद केंद्र अध्यक्ष अभय कुलकर्णी व कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सिंहस्थ कुंभपर्वाच्या काळात प्रभावी संवाद आणि माहिती प्रसारणासाठी हे माध्यम केंद्र मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास नाशिक शहरातील माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


