नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गोदावरी नदीतून लिफ्ट इरिगेशनद्वारे मानार खोऱ्यातील लिंबोटी धरणात पाणी आणणे आणि पुढे हे पाणी मानार धरणात सोडण्यासंदर्भात डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी खतगावकर परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर सरजितसिंघ गिल, राजू गंदीगुडे, भास्कर भिलवंडे, संजय लहानकर, दीपक पावडे, दिलीप कोडगिरे आदी उपस्थित होते.


