नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : नागपूरमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूरमधील एका रुग्णालयाच्या संचालकाकडून १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अनिरुद्ध पुरी यांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, गुरुवारी दुपारी हे आदेश पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचले. घटनेनंतर दोन ते तीन दिवसांनी डॉक्टरांकडून धमकी आणि पैशांची मागणी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी संबंधितांकडून पोलीस ठाण्यात येण्यात विलंब झाल्याने प्रकरण प्रलंबित राहिले. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी शहरातील डॉक्टरांची बैठक घेतली. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेसोबतच या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित झाला. यानंतर ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत असून, खंडणीच्या आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


