नागपूर, उज्वल रोकडे ( प्रतिनिधी ) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरात आज, 7 सप्टेंबर 2026 रोजी, धनगर युवक मंडळ नागपूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, हुडकेश्वर नागपूर यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी, नागपूर यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा निवेदनातून प्रामुख्याने मांडण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली.यासोबतच मुंबई-पुणे मिसिंग लिंकला हुतात्मा वीर शिक्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. धनगर समाजाच्या इतिहासातील योगदान आणि बलिदानाची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या भावनेतून ही मागणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आणि लोककल्याणाच्या विचारांची आठवण जपण्यासाठी त्यांच्या नावाला सार्वजनिक स्थळाशी जोडण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली आहे.
या वेळी शिष्टमंडळात रमेश पाटील, गणेश पावडे, महादेव पातोंड, साहेबराव सरोदे, देविदास आगरकर, अशोक खाडे, ज्ञानेश्वर घायवट, नामदेव खाटके, तुरारे आणि नेहा निगोट यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजातील बांधव आणि भगिनी उपस्थित होते. समाजाच्या मागण्या केवळ कागदावरील निवेदनापुरत्या मर्यादित न राहता शासनाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांची दखल घेतली जावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आपल्या हक्कांसाठी आणि समाजाच्या इतिहासाला योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी दिसून आला.


