अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त जिल्ह्यातील तसेच शहरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषद, अहिल्यानगर शाखेच्या वतीने मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि श्रद्धाळूंना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे मंदिर अर्चक-पुरोहित आयाम संपर्क प्रमुख श्रीकांत नांदापूरकर यांनी हे आवाहन केले आहे. आपण ज्या प्रकारे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे मंदिरांचीही स्वच्छता केली पाहिजे. आपल्या परिसरातील मंदिरे ही ऊर्जाकेंद्रे आहेत. त्यामुळे मंदिरांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर प्रशासन, नियमित येणारे भाविक, परिसरातील नागरिक आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त सहभागातून ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानात परिसरातील तरुण-तरुणी, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा मंदिरांशी स्नेह आणि जिव्हाळा वाढण्यास मदत होईल. मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि दीपावलीपूर्वी मंदिरे स्वच्छ व सुंदर करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल जोशी, विभागाचे पदाधिकारी खिस्ती सर, गजेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.


