नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी) : दिव्हाइन व्हिजन फिल्म प्रॉडक्शनच्या आगामी मराठी चित्रपट ‘आशांतर’मधील आयटम साँगचे रेकॉर्डिंग मुंबई येथील प्रतिष्ठित लता मंगेशकर स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याला मराठी संगीतविश्वातील सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे.
या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक जय लाहोरी असून, सहनिर्माते राकेश पटेल आहेत. गाण्याच्या रेकॉर्डिंगप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. यामध्ये अभिनेते शाम थोम्बरे, लाइन प्रोड्युसर मीनल देसाई, डीओपी साहिल सातदेवे, प्रॉडक्शन हेड शशांक नहार, शशांक राऊत, प्रशांत चव्हाण आणि रवींद्र वीरकर यांचा समावेश होता. या गाण्याचे संगीत संयोजन बॉलिवूड संगीत क्षेत्रातील संगीतकार अजिंक्य सोंटक्के आणि बाबा किशोर यांनी केले आहे, तर गाण्याचे गीतलेखन पद्माकर मलकापुरे यांनी केले आहे. लोकप्रिय गायिका, संगीतकार आणि गीतकार यांच्या सहभागामुळे या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘आशांतर’ या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच नागपूर येथे सुरू होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि अनुभवी तंत्रज्ञांच्या सहकार्याने साकारत असलेल्या या चित्रपटाची तयारी सध्या सुरू आहे. चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक जय लाहोरी आणि सहनिर्माते राकेश पटेल यांनी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी योगदान देणाऱ्या गायिका वैशाली सामंत, संगीतकार, गीतकार, कलाकार आणि संपूर्ण तांत्रिक टीमचे अभिनंदन केले असून, चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपटाची माहिती
चित्रपट : आशांतर (AASHANTAR)
निर्मिती संस्था : दिव्हाइन व्हिजन फिल्म प्रॉडक्शन
निर्माते व दिग्दर्शक : जय लाहोरी
सहनिर्माते : राकेश पटेल
गायिका : वैशाली सामंत
संगीत संयोजन : अजिंक्य सोंटक्के, बाबा किशोर
गीतकार : पद्माकर मलकापुरे
चित्रीकरणाचे ठिकाण : नागपूर


