चंद्रपूर : पर्यावरण संवर्धनासाठी केवळ घोषणाच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची असते. याच विचारातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत तब्बल 2 लाख सीडबॉल तयार केले आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकारातून 8 शासकीय आणि 24 अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेत हरित भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले.
आदिवासी समाजाचा निसर्गाशी असलेला घट्ट संबंध आणि पर्यावरणाबद्दलची जपलेली परंपरा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ व्हावी आणि निसर्गाशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. गेल्या काही वर्षांत वाढती जंगलतोड, कमी होत चाललेले वनक्षेत्र आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सीडबॉलसारख्या नैसर्गिक पद्धतीने वृक्षसंवर्धनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च महिन्यापासूनच या उपक्रमाचे नियोजन सुरू करण्यात आले होते.
शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांनी कडुलिंब, सुबाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबा आणि इतर स्थानिक वृक्षांच्या बियाण्यांचे संकलन केले. माती, शेणखत आणि बियाण्यांच्या साहाय्याने त्यांनी स्वतःच्या हाताने सीडबॉल तयार केले. प्रत्येक शाळेला 5 ते 10 हजार सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या मोहिमेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून सुमारे 2 लाख सीडबॉल तयार करण्यात यश आले.
रिमझिम पावसात विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांचा परिसर, मुख्य रस्त्यांच्या कडेला, जंगल, डोंगराळ भाग आणि गावातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात सीडबॉलचे विसर्जन केले. पावसाच्या पाण्यामुळे या बियाण्यांचे अंकुरण होऊन भविष्यात हजारो नवीन वृक्ष उभे राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभी राहिलेली ही हरित चळवळ चंद्रपूरच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची ठरेल. हा उपक्रम आता दरवर्षी नियमितपणे राबविण्यात येणार असून, पुढील वर्षी 5 लाख सीडबॉल तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.


