गाथावनात १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांचे वृक्षारोपण

“मस्तीत पण शिस्तीत” ४००सदस्यांचा पर्यावरण संवर्धनाचा उत्स्फूर्त सहभाग

देहूगाव, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : तीर्थक्षेत्र देहूगाव येथील गाथावनात ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन, पुणे’च्या वतीने ‘एक कुटुंब – एक झाड’ या संकल्पनेतून १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या या उपक्रमात सुमारे ४०० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अभंग इंग्लिश मीडियम स्कूलपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष आणि वृक्षदिंडीच्या माध्यमातून सहभागी गाथावनात दाखल झाले. त्यानंतर पारंपरिक मंत्रोच्चारात प्रातिनिधिक वृक्षपूजन करण्यात आले. वृक्षपूजनावेळी उपस्थितांनी झाडावर गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून पर्यावरण संवर्धनाचा आनंदोत्सव साजरा केला. यानंतर १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाने आपल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत, ‘झाड लावायचेच नाही, तर ते जगवायचे’ असा संकल्प केला.

वर्षभर सामाजिक उपक्रमांची परंपरा

‘आपला परिवार सोशल फाउंडेशन’चे हे सलग सहावे वर्ष असून, संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. साधारण दर तीन महिन्यांनी एक सामाजिक उपक्रम आयोजित करण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. मकरसंक्रांतीचा स्नेहमेळावा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, ‘एक हात मदतीचा’ यांसह महिलांच्या सन्मानासाठी महिला दिनाचे विशेष आयोजन केले जाते. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि कुटुंबातील स्नेहबंध यांची सांगड घालत संस्थेची वाटचाल सुरू आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाला संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज, ‘वृक्षदायी’ संस्थेचे अध्यक्ष व ‘हरित वारी’चे प्रणेते ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे तसेच अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक व व्याख्याते प्रा. विकास कंद यांची प्रमुख उपस्थिती होती. ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपक्रमाचे कौतुक केले. “वृक्षसंवर्धन ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर पुढील पिढीप्रती असलेली सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प व्यक्त करत “आता आपण गावोगावी संत गाथा वृक्षरूपाने मांडणार आहोत,” असे सांगितले.

प्रा. विकास कंद यांनी कुटुंब आणि पर्यावरण यांची सांगड घालत, “कुटुंब ही समाजाची पहिली शाळा आहे. याच कुटुंबातून पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजविण्याचे काम आपला परिवार करीत आहे,” असे सांगितले. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनीही झाड लावणे ही केवळ सुरुवात असून ते जगविणे आणि पुढील पिढीला हिरवा वारसा देणे ही खरी पर्यावरणसेवा असल्याचे नमूद केले. ‘ही आपल्या परिवाराची खरी ताकद’ कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपला परिवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. शिंदे यांनी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.

“एखादा उपक्रम आयोजित करणे सोपे असते; परंतु त्या उपक्रमामागे शेकडो कुटुंबांना एका विचाराने, एका ध्येयाने आणि एका भावनेने उभे करणे ही मोठी गोष्ट आहे. आज आपण १०८ कुटुंबांना आणि सुमारे ४०० सदस्यांना एकत्र आणले आहे, हीच आपल्या परिवाराची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले. आज लावलेली १०८ वृक्षरोपे ही केवळ रोपे नसून १०८ कुटुंबांची पर्यावरणाशी जोडलेली नाती आहेत, असे सांगत त्यांनी प्रत्येक कुटुंबाने आपल्या वृक्षाचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

‘ऑक्सिजन फॅक्टरी’चे ‘गाथावना’त रूपांतर

आपला परिवारने जुलै २०२१ मध्ये याच परिसरात वृक्षारोपणाला सुरुवात केली होती. त्यावेळी सुरू झालेल्या ‘ऑक्सिजन फॅक्टरी’ या संकल्पनेने पुढे व्यापक स्वरूप घेत आज ‘गाथावन’ म्हणून सुंदर रूप धारण केले आहे. मागील सहा वर्षांच्या पर्यावरणीय वाटचालीत वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृतीवर भर देण्यात आला. ‘उपक्रम करा आणि त्याची जबाबदारीही घ्या’ हा आदर्श या सातत्यपूर्ण कार्यातून निर्माण झाला आहे. त्याच वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ‘१०८ कुटुंबे – १०८ देशी वृक्ष’ या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

नियोजनबद्ध कार्यक्रम; सहकाऱ्यांचा गौरव

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचालन राधा मराठे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार, मनोगत आणि मार्गदर्शन झाले. तसेच ‘वृक्षदायी’ संस्थेच्या पर्यावरणीय कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शिर्के, दीपक मराठे, अनिल शर्मा, वामनराव आवटे, यशवंत महाजन, दत्ता बोऱ्हाडे, किरण कांबळे, प्रसाद भाबल, महंमदशरीफ मुलाणी, पांडुरंग सुतार आणि संदीप दरवेशी यांनी विशेष प्रयत्न केले.

सामुदायिक पसायदानाने सांगता; गाथावनात वनभोजनाचा संकल्प

कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली. समारोपप्रसंगी एस. आर. शिंदे यांनी उपस्थित सदस्यांना आगामी काळात गाथावनात वनभोजनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. “येत्या वर्षभरात आपण सर्वांनी घरूनच डबा घेऊन गाथावनात यावे आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवावेत,” असे त्यांनी सांगितले. या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे आगामी काळात गाथावन हे केवळ वृक्षसंवर्धनाचे ठिकाण न राहता परिवारातील स्नेहबंध दृढ करणारे आणि निसर्गस्नेहाचे केंद्र बनविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘मस्तीत पण शिस्तीत’, ‘एक कुटुंब – एक झाड’ आणि ‘१०८ कुटुंबे – १०८ देशी वृक्ष’ या घोषणांनी गाथावन परिसर दुमदुमून गेला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…