महाराष्ट्र : अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत आता पारंपरिक खिचडीसोबत व्हेज पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ आणि स्वतंत्र मसाला पाकीट देण्यात येणार आहे. सुधारित आहाराचा पुरवठा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.
लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, चविष्ट आणि रुचकर आहार मिळावा, तसेच बालके आणि मातांनी हा आहार आवडीने स्वीकारावा, या उद्देशाने खाद्यसूचीत बदल करण्यात आला आहे. सुधारित नियोजनानुसार पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाईल. मात्र, तूरडाळ खिचडी प्रीमिक्सच्या जागी आता व्हेज पुलाव दिला जाणार आहे. तसेच भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफ (मल्टीग्रेन न्यूट्री पफ) लाभार्थ्यांना मिळणार आहे. बहुधान्य-प्रथिन मिश्रणाचा समावेश मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत असून, या कें द्रांमार्फत सुमारे १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नवीन खाद्यसूचीचा लाभ या सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. महिला व बालविकास समितीच्या सभापती अंकिता पाटील यांनी सांगितले की, सुधारित आहारामुळे लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार, पौष्टिक आणि चविष्ट अन्न मिळेल. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये नव्या खाद्यसूचीनुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे.नवीन मेन्यूमुळे बालकांच्या पोषणात भर पडण्यासोबतच गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही अधिक संतुलित व सकस आहार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


