अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : शहरातील कोठला परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस साठवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या भारतीय जीव-जंतु कल्याण बोर्डाचे मानद पशुकल्याण प्रतिनिधी मयूरसिंह राजपुरोहित यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित हॉटेल व कथित साठवणूकस्थळ सील करण्याची मागणी केली.
कोठला परिसरातील हॉटेल कुरेशीच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ हजार ७०० किलो गोमांस, चार सत्तूर, पाच धारदार चाकू व दोन वजनकाटे असा सुमारे ५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मयूरसिंह राजपुरोहित यांनी २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे निवेदन सादर केले. संबंधित हॉटेल व कथित अनधिकृत गोदाम तातडीने सील करावे, अनधिकृत बांधकाम आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी तसेच प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, राजपुरोहित यांनी अहिल्यानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. दिलीप टिपरसे यांचीही भेट घेतली. यावेळी शहरातील अवैध गोमांस विक्री व कथित कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकारामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई होणे आवश्यक असल्याचे राजपुरोहित यांनी यावेळी सांगितले. तसेच अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, कोठला परिसरातील या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


