इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात नवे दानवाड येथे बेमुदत जल सत्याग्रह आंदोलन

₹४३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला विरोध; थकीत पाणीपट्टी वसुली आणि प्रकल्प रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी

नवे दानवाड ,राजन शेळके (प्रतिनिधी) : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या ₹४३०.१० कोटी खर्चाच्या ‘जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण ८९ MLD पाणीपुरवठा योजने’विरोधात दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. या योजनेला तात्काळ आणि कायमस्वरूपी स्थगिती देऊन ती रद्द करावी, या मागणीसाठी ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवे दानवाड येथील मारुती मंदिरासमोर बेमुदत ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

या प्रकरणी सविस्तर कायदेशीर निवेदन जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि तहसीलदार, शिरोळ यांना सादर करण्यात आले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सांगली पाटबंधारे मंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला पाठवण्यात आल्या आहेत. सांगली पाटबंधारे उपविभागाने (नृसिंहवाडी) २९ मार्च २०२५ रोजी पाठवलेल्या अंतिम वसुली नोटीस आणि सीलिंग पंचनाम्यांनुसार, इचलकरंजी महानगरपालिकेकडे तब्बल २३ कोटी ६५ लाख ६९ हजार १३६ रुपयांची पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मूळ कराराचा भंग करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकवला असताना नवीन प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ७ व ८ चा संदर्भ देत ग्रामसभेच्या अधिकारांचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. जुने दानवाड, नवे दानवाड, सैनिक टाकळी, दत्तवाड आणि घोसरवाड या बाधित ग्रामपंचायतींनी योजनेविरोधात एकमुखाने विरोधी ठराव संमत केल्याचे सांगण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतींची नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) नसताना हा प्रकल्प पुढे नेणे लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात कृष्णा-पंचगंगा नदीपात्रातून अतिरिक्त ८९ MLD पाणी उपसा केल्यास स्थानिक शेतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन पिके वाळण्याची आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पावसाळ्यात अलमट्टी आणि हिप्परगी बॅकवॉटरमुळे निर्माण होणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात या योजनेचे बांधकाम झाल्यास पुराचा धोका वाढू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून इचलकरंजी महानगरपालिकेची ८९ MLD राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ आणि कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जुन्या आरक्षणाची २३.६५ कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल होईपर्यंत आणि बाधित सर्व ग्रामपंचायतींचे कायदेशीर नाहरकत प्रमाणपत्र अथवा ठराव प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR), निविदा प्रक्रियेला किंवा अन्य कोणत्याही कामाला प्रशासकीय मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टी प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेवर कडक कायदेशीर कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या आंदोलनात पँथर आर्मीचे प्रमुख संतोषदादा आठवले, नवे दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, जुने दानवाडचे माजी सरपंच सुकुमार पाटील, प्रकाश परिट, संजय धनगर, खंडेराव चव्हाण, ॲड. राहुलराज कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सज्जनसिंग रजपूत, कुमार रजपूत सर, शिवानंद माळी, श्रावण कांबळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख भगतसिंग शिलेदार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष दिनेश कांबळे यांच्यासह ‘राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती’चे सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक आणि कृषी पंपधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…