चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीआरटी), चंद्रपूरच्या वतीने भारत सरकारच्या ‘उन्नत भारत अभियानांतर्गत’ दत्तक घेतलेल्या अरवत गावात ग्रामस्थांशी संवाद साधून मूलभूत सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील समस्या, गरजा आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महाविद्यालयाने उन्नत भारत अभियानांतर्गत अरवत, जुनोना, करवा, मामला आणि वायगाव या पाच गावांना दत्तक घेतले असून, या सर्व गावांमध्ये ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला हातभार लावणे, यावर या उपक्रमांमध्ये भर दिला जात आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियांत्रिकी आणि खाण अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी अरवत गावातील सर्वेक्षणात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गावातील विविध भागांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील मूलभूत सुविधा, स्थानिक समस्या, नागरिकांच्या गरजा आणि विकासासंदर्भातील अपेक्षांची माहिती संकलित करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांविषयी ग्रामस्थांना माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान अरवत गावच्या सरपंच श्रीमती सुलभा भोंगारे यांच्याशी चर्चा करून गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. या उपक्रमासाठी प्रा. वझुल खान आणि डॉ. एम. ए. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे उन्नत भारत अभियान समन्वयक प्रा. प्रदीप लाड यांनी उपक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वास्तविक परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळाली. अभियांत्रिकीचे ज्ञान केवळ तांत्रिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. महाविद्यालय आणि ग्रामसमुदाय यांच्यात समन्वय वाढवून दत्तक गावांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने उन्नत भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.


