अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे महासचिव प.पू. श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून या कथा सोहळ्याचे निरूपण होणार आहे.
२९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कथा होणार असून, शनिवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सांगता होईल. पहिल्या दिवशी शिवजन्मपूर्व काळ, तत्कालीन परिस्थिती, शिवजन्म ते स्वराज्याची शपथ आणि संतकार्य यांचे निरूपण केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी कान्होजी जेधे, जावळीचा वेढा, प्रतापगड युद्धनीती, अफझलखान वध; तिसऱ्या दिवशी पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर स्वारी, प्रथम आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह या विषयांवर कथा होईल. चौथ्या दिवशी आग्रा येथून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा आणि सिंहगड अर्थात तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मांडली जाणार आहे. पाचव्या दिवशी महाराजांचे विजय पर्व, शिवराज्याभिषेक, स्वराज्याची स्थापना आणि भारतव्यापी हिंदवी साम्राज्य या विषयांवर कथा निरूपण होईल.
या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदनवन उद्योग समूहाचे श्री. संजय जाधव आहेत. मंचचे प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन असून, ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे यजमानपद श्री. सुमित संतोष वर्मा भूषविणार आहेत. वैदिक पद्धतीने होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. सोहळ्याच्या उत्तम नियोजनासाठी संपर्क व समन्वय, मंडप व मंच व्यवस्था, आरती व्यवस्था, निमंत्रण पत्रिका वितरण, प्रचार-प्रसार आणि राज्याभिषेक उत्सव आदी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून विविध स्तरांवर नियोजन सुरू आहे.
शिवशाहीच्या इतिहासात योगदान दिलेल्या अहिल्यानगर शहरात प्रथमच हा भव्य कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीने जाणून घेणे आजच्या काळात आवश्यक असल्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. नगरकरांनी, विशेषतः युवकांनी, दररोज होणाऱ्या कथा निरूपणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदलाल मणियार, उपाध्यक्ष श्री. मोहनलाल मानधना, सचिव श्री. सुरेश चांडक, कोषाध्यक्ष श्री. मगनलाल पटेल, विश्वस्त तसेच निमंत्रित कार्यकारिणी मंडळातील मान्यवरांनी केले आहे.


