अहिल्यानगर : अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला गणेशोत्सव आणि पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने हिरे, सोने, पोवळे आणि माणिक अशा बहुमूल्य धातू-रत्नांमध्ये साकारलेला त्रिशूल-शक्ती तिलक अर्पण करण्यात आला. या तिलकाची संपूर्ण संकल्पना विनीत बोरा यांची असून, त्यांच्या वतीने हा तिलक श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला.
विनीत बोरा मित्र परिवारातील संजय बोगावत, पवन झंवर, गोपाल मालू, वरुण चोपडा, चिराग मेहता, आनंद काळे, रोहन मुथा (पुणे), योगेश बजाज (पुणे), निखिल शिंगवी (पुणे) आणि अमित झंवर (पुणे) यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या तिलकासाठी सिमरतमतल कुंदनमल ज्वेलर्स, कापड बाजार, अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल विनीत अजित बोरा, ईश्वर अशोक (बाबुशेठ) बोरा आणि गौतम विजय बोरा यांचे आभार मानण्यात आले. या तिलकात त्रिपुंड, त्रिनेत्र आणि त्रिशूल-शक्ती अशा तीन प्रमुख धार्मिक प्रतीकांचा समावेश आहे. मनुष्याला स्थिरता आणि दैवी चैतन्य प्रदान करणारे आध्यात्मिक प्रतीक म्हणून त्रिपुंडाची रचना करण्यात आली आहे. सोने आणि शुभ्र पोवळ्यांपासून घडविलेल्या या आकृतीत सोने हे स्थैर्याचे प्रतीक असून, प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला सुंदर पोवळ्यामध्ये स्वतःचे सामावून घेण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. पोवळ्याच्या स्मात संक्रमणाचे प्रतीक म्हणून तसेच शिवाच्या कपाळी सजण्याचा अवसर स्वतः समुद्रदेवाने दिला, अशी धार्मिक संकल्पनाही यामागे मांडण्यात आली आहे.
विनीत बोरा म्हणाले, त्रिनेत्र हे दिव्य दर्शन, दृष्टी आणि प्रखर बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले आहे. दिव्य ज्ञान आणि हृदयाची बुद्धिमत्ता या गुणांचे दर्शन घडविणारे माणिक रत्न, प्रखर प्रकाशरूपी बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेला हिरा आणि सोन्याच्या माध्यमातून या त्रिनेत्राची रचना करण्यात आली आहे. त्रिशूल-शक्ती तिलक हा शिव-शक्तीतून निर्माण झालेल्या आकाराचे तसेच तीन काळ आणि प्रकृतीच्या त्रिगुणांचे दर्शन घडविणारे प्रतीक आहे. साक्षात शक्तिरूप मानले जाणारे हे तिलक श्री विशाल गणपतीच्या कपाळी शोभून दिसते. दिव्य शक्तीमध्ये दोन वेगळे, मात्र परस्परपूरक गुण सामावून घेतले आहेत. हे दोन गुण म्हणजे असाधारण पराक्रम आणि धैर्य. पराक्रमाचे प्रतीक माणिक, तर धैर्याचे प्रतीक हिरा असून, सोने आणि माणिकांच्या माध्यमातून त्रिशूलाची रचना करण्यात आली आहे.
तिलकाच्या काठाची रचना रुबी आणि अस्सल माणिकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वैभव, ज्ञान, दिव्यदृष्टी, अध्यात्म, स्थैर्य, धैर्य आणि पराक्रम या सर्व गुणांचे दर्शन घडविणारा हा तिलक असून, सुवर्ण, पोवळे, माणिक आणि हिरा अशा बहुमूल्य धातू-रत्नांनी तो साकारण्यात आला आहे. हा प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर तो पूर्ण श्रद्धेने श्रींच्या चरणी समर्पित करण्यात आला. गणेशोत्सव तसेच पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने हा दुग्धशर्करा योग साधून श्री विशाल गणपतीला तिलक अर्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल माळी वाडा परिवार आणि नाथजी महाराज यांचे विनीत बोरा मित्र परिवाराने आभार मानले.


