जर तुमच्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झाली असेल आणि अजूनही HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट बसवली नसेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण HSRP बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ म्हणजेच आज संपत असून, १ जुलैपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे किमान आजच अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून अपॉइंटमेंट निश्चित करणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. वाहनचोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची मानली जात आहे. मुदत संपल्यानंतर परिवहन विभाग आणि पोलीस संयुक्तपणे तसेच स्वतंत्रपणे रस्त्यावर तपासणी करणार आहेत. HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र, ३० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाणार नाही.
HSRP नंबर प्लेट नसल्यास केवळ दंडच नव्हे, तर RTOच्या अनेक महत्त्वाच्या सेवांवरही निर्बंध येणार आहेत. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच इतर अनेक सेवा मिळणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी सध्या HSRPची अट लागू करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्या सेवेसाठी वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.अजूनही नोंदणी केली नसेल, तर वेळ न दवडता आजच HSRPसाठी ऑनलाइन नोंदणी करा. कारण उद्यापासून केवळ दंडच नाही, तर अनेक महत्त्वाच्या वाहनसंबंधित कामांनाही ब्रेक लागू शकतो.


