FDAच्या कारवाईने वाद पेटला; गोरस भांडाराचे ५० लाखांचे नुकसान, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शेतकरी, गोपालक आणि कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचा दावा

वर्धा : गोरस भांडारावरील FDAच्या कारवाईनंतर वर्ध्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईमुळे संस्थेचे ५० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करत वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संस्थेला आणि तिच्याशी जोडलेल्या शेतकरी, गोपालक, दूध उत्पादक तसेच कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंडळाचे मंत्री कन्हैया छांगाणी यांनी सांगितले की, गोरस भांडाराची स्थापना महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि सेठ जमनालाल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण स्वावलंबन, गोसंवर्धन आणि शेतकरी हिताच्या उद्देशाने करण्यात आली होती. अनेक दशकांपासून ही संस्था वर्धा जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार राहिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कारवाईदरम्यान सुमारे २६ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि संस्था तब्बल ३८ ते ४० दिवस बंद राहिली. त्यामुळे संस्थेचे ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले. याचा थेट फटका दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना, गोपालकांना आणि कर्मचाऱ्यांना बसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या कारवाईची प्रक्रिया, तिची आवश्यकता आणि त्यामध्ये प्रक्रियात्मक त्रुटी झाल्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे मंडळाने नमूद केले. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा, अधिकारांचा दुरुपयोग किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक कठोर कारवाई झाली असल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.गोरस भांडार हे केवळ एक व्यावसायिक केंद्र नसून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी जोडलेले असल्याने या प्रकरणाला आता सामाजिक आणि आर्थिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी अपेक्षा संबंधित घटकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

PUNE | शिंदेसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

SOLAPUR | बार्शीत कापड व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला