मुंबई : राज्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्याचा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजामुळे दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून पुन्हा सक्रिय होत असून महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसाने जून महिन्यातील पावसाची तूट काही प्रमाणात भरून काढली होती. मात्र त्यानंतर तीन-चार दिवस पावसाने उघडीप घेतल्याने विदर्भ, मराठवाडा आणि काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना आता पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठीही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ८५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांमध्येही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आजही ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळू शकतो. पावसाच्या विश्रांतीमुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण जाणवत असून नागरिकांना घामाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खरीप हंगामासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्याने पावसाच्या पुनरागमनाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसासह काही ठिकाणी जोरदार सरींचा अनुभव येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


