नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, कमी दराने आयात करण्यात आलेले कच्चे तेल भारतातील रिफायनरीमध्ये पोहोचून त्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर दिसून येईल. त्यामुळे सध्या किमती कमी झाल्या असल्या तरी इंधनाचे दर तात्काळ कमी होणार नाहीत. दरात बदल करण्याचा अंतिम निर्णय सरकारी तेल विपणन कंपन्या बाजारातील परिस्थितीचा विचार करून घेतील.
पुरी यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने चढ-उतार होत असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तुलनेने नियंत्रणात राहिल्या आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे जागतिक बाजारातील वाढीचा पूर्ण परिणाम ग्राहकांवर झाला नाही.कच्चे तेल खरेदी केल्यानंतर ते भारतात आणणे, त्याचे शुद्धीकरण करणे आणि त्यापासून पेट्रोल-डिझेल तयार करून बाजारात उपलब्ध करण्यासाठी काही कालावधी लागतो. तसेच, तेल कंपन्यांकडे आधीच्या जास्त दराने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम लगेच किरकोळ इंधन दरांवर दिसून येत नाही.
काही दिवसांपूर्वी मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र, परिस्थिती पूर्ववत होताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


