पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण केंद्राने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असली तरी भारतीय नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. इंधन दर कमी होणार का, या चर्चेला आता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी पूर्णविराम दिला आहे.
पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणाव काहीसा निवळल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे देशातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कमी दरातील कच्चे तेल भारतात पोहोचण्यासाठी आणि त्याचा परिणाम इंधन दरांवर दिसण्यासाठी काही काळ लागणार असल्याचे सुरेश गोपी यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भारतात येणारे बहुतांश कच्चे तेल होर्मूझ सामुद्रधुनीमार्गे आणले जाते. सध्या या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम तेल कंपन्यांवरही झाला आहे. ग्राहकांवरील भार वाढू नये म्हणून केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी काही प्रमाणात आर्थिक ताण स्वतः सहन केला. यामुळे केंद्राला सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा गोपी यांनी केला.याशिवाय, गेल्या चार महिन्यांत अनेक राज्यांनी इंधनावरील करांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे महसुलाचा समतोल राखण्यासाठी सध्याचे दर कायम ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात होण्याची शक्यता कमी आहे. जागतिक परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच इंधन दरांबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.

Related Posts

पावसाची प्रतीक्षा कायम; लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके, तापमान ३८ अंशांवर

लातूर : जून महिना अर्धा उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने लातूरकरांना पुन्हा एकदा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना सध्या ३७ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या झळा…

नागपूर विमानतळाच्या नव्या पर्वाची सुरुवात! २५ जूनपासून जीएमआरकडे कारभार

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. येत्या २५ जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे जीएमआर समूहाकडे हस्तांतरित केला जाणार असून, यामुळे विमानतळाच्या आधुनिकीकरण…