अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील

उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची एकमताने निवड

अहिल्यानगर. राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपविण्यात आली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या राजकीय घडामोडींकडे लागले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय विचारांचे आणि गटांचे नेतृत्व एकत्र आणून सहकाराच्या माध्यमातून समन्वय साधण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटांमध्ये समन्वय साधत सहकार विकास आघाडीची बांधणी करण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने १७ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १८ वर पोहोचले. तसेच सभापती राम शिंदे यांच्या गटातील संचालक सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही डॉ. सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांना पाठिंबा दिला. या घडामोडींनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. विखे यांनी केवळ जागांचे गणित न पाहता जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संचालकांच्या भूमिका समजून घेण्यावर भर दिला. मतभेद असलेल्या नेतृत्वांमध्ये संवाद घडवून आणणे, गैरसमज दूर करणे आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेला प्राधान्य देणे, या माध्यमातून त्यांनी राजकीय समन्वयाची भूमिका बजावली. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळातील शंकरराव गडाख, रणजितसिंह देशमुख, अक्षय कर्डिले, बिपीन कोल्हे, मोनिका राजळे, राजश्री घुले, करण ससाणे, दत्ता पानसरे, सचिन जगताप, ज्योती प्रकाश शिंदे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, संगीता जयंत वाघ, कारभारी जावळे, गणपतराव सांगळे, वैभव पिचड, संजीवनी शिंदे आणि सचिन घुमरे आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील यांना सहकार क्षेत्राचा अनुभव असून, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी सहकारी संस्थांचे व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित कामकाजाचा अनुभव घेतला आहे. आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या आर्थिक संस्थांपैकी एक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आर्थिक मदत, सहकारी संस्थांना वित्तपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सक्षम करणे, शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे, थकबाकीचे प्रश्न सोडविणे आणि आधुनिक बँकिंग व्यवस्थेचा विस्तार करणे ही नव्या अध्यक्षांसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील परस्परविरोधी राजकीय भूमिका असलेल्या नेतृत्वांना सहकाराच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता त्यांच्याकडेच बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे राजकीय समन्वयक आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व अशा दुहेरी भूमिकेत त्यांचा हा प्रवास जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची एकमताने निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या आगामी वाटचालीकडे सहकार क्षेत्रातील शेतकरी, संस्था आणि सभासदांचे लक्ष लागले आहे. नव्या नेतृत्वाकडून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नांदेडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!

नांदेड. शहरात पिण्याच्या पाण्याचा वाढता अपव्यय लक्षात घेता भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी आहे म्हणून त्याची किंमत नाही, ही मानसिकता बदलण्याची…

राज्य नाट्यस्पर्धेच्या तालमींना वेग

चंद्रपूर. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी चंद्रपूर केंद्रावर नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२६ पासून प्रियदर्शिनी इंदिरा…