चंद्रपूर. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी चंद्रपूर केंद्रावर नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२६ पासून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर चंद्रपूर आणि परिसरातील नाट्यरसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा मुख्य उद्देश हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी रंगभूमीची परंपरा अधिक समृद्ध करणे हा आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया आदी भागांतील एकूण १५ नाट्यसंस्था या केंद्रावरील प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कलाकारांकडून संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि वेशभूषा यांचा कसून सराव सुरू आहे. विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या नाट्यशैली आणि आशयांचा अनुभव घेता येणार आहे.
या स्पर्धेमुळे नवोदित कलाकारांसह अनुभवी रंगकर्मींनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार आहे. नाटकांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी भावविश्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोग प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. प्रवेश शुल्क १५ रुपये आणि १० रुपये असे ठेवण्यात आले आहे. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
दिवाळीनंतर चंद्रपूरच्या सांस्कृतिक वातावरणात रंगभूमीचा उत्साह संचारणार असून, ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून नाट्यप्रेमींना मनोरंजनासोबतच दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.


