नांदेड. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील ऐतिहासिक तख्त सचखंड गुरुद्वारात पारंपरिक तख्त स्नान सोहळ्याने दिवाळी उत्सवाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या या पवित्र सोहळ्यास देश-विदेशातून हजारो शीख भाविकांनी उपस्थिती लावली.
तख्त स्नान ही परंपरा जगभरात केवळ नांदेड येथे जपली जात असल्याने शीख धर्मात या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने हा सोहळा पार पडला.
शनिवारी या धार्मिक विधीला घागरीया साहेब आणि पंचप्यारे साहिब यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पंचप्यारे साहिब गोदावरी नदीच्या नगीना घाटावर पोहोचले. तेथे विधिवत अरदास करण्यात आली. त्यानंतर गोदावरी नदीचे पवित्र जल घागरीत भरून पंचप्यारे साहिब गुरुद्वाराकडे रवाना झाले.
त्यांच्या पाठोपाठ हजारो भाविकांनीही घागरीतून पवित्र जल आणत या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. गोदावरीच्या पवित्र जलाने संपूर्ण गुरुद्वारा परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच गुरुद्वारातील ऐतिहासिक आणि पवित्र शस्त्रांचीही या जलाने स्वच्छता करण्यात आली.
या सोहळ्यामुळे संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या ऐतिहासिक धार्मिक परंपरेत सहभाग नोंदविला.
यावेळी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सचिव सरदार रवींद्रसिंघ बुंगई, बोर्डाचे सदस्य सरदार मनजीतसिंघ कुंजीवाले, सरदार गुरमीतसिंघ महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार रवींद्रसिंघ कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या हजारो भाविकांचे आभार मानले.
नांदेडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा हा तख्त स्नान सोहळा दिवाळी उत्सवाच्या प्रारंभाचे खास आकर्षण ठरला.


