अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या अग्रीम मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४०३ कोटी ६४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने मदत जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाने दिलेली ओढ, पिकांचे झालेले नुकसान, घटलेले उत्पादन आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या. परिस्थितीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला.
राज्य सरकारच्या मदतीच्या पहिल्या टप्प्यातच अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध झाली आहे. प्रशासनानेही मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली.
शेतकऱ्यांवरील संकटाच्या काळात केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे, ही भूमिका आपण सातत्याने मांडली आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा, वीजपुरवठा आणि शेतीच्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंतही मदत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या गरजा भागविण्यासह आगामी शेती हंगामाच्या तयारीसाठी मोठा आधार मिळणार आहे.

