पुणे, उमेश आबनावे(जिल्हा प्रतिनिधी) : दिवाळीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून सरहद परिवाराच्या वतीने यंदा ऐतिहासिक राजगडावर सोळाव्या वर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजगडावर सुरू झालेल्या या उपक्रमाला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, यंदा राजगडसह महाराष्ट्रातील तेरा ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर तसेच वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना दीपांजली अर्पण करण्यात आली. अशा एकूण चौदा ऐतिहासिक ठिकाणी दीपप्रज्वलन करून स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांच्या मार्गदर्शनाखाली, सरहद परिवाराचे मुख्य समन्वयक व राजगड दीपोत्सव प्रमुख मयूर मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. राजगडावरील दीपोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रम नसून स्वराज्याच्या इतिहासाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा, नव्या पिढीला गड-किल्ल्यांच्या इतिहासाशी जोडण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव व माणुसकीचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा एक वैचारिक प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी दीप प्रज्वलित करत इतिहासाचा जागर करण्याचा संकल्प सरहद परिवाराने जपला आहे.
राजगडच्या या दीपोत्सवी परंपरेला जोड देत यंदा या समन्वयकांनी उत्सव प्रमुख म्हणून दीपोत्सव साजरा केला. तिकोना – संदीप कदम, रायरेश्वर – अनिल सोनवणे, प्रतापगड – प्रतीक खुटवड, अजिंक्यतारा – तुषार फरांदे, शिवनेरी – संजय भोईटे व सुधीर खारवे, पुरंदर – बाळासाहेब रुपनर व दत्ता चोरगे, मल्हारगड – सागर पारखी, केंजळगड – तानाजी निंबाळकर, प्रेमगिरी – सुनील दिघे, सिंहगड – निलेश पवळे, तोरणा – विनायक पडवळ, रोहिडेश्वर – विठ्ठल पोळ आणि वढू-तुळापूर – अभिजीत देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमाला चंद्रकांत दादा मांगडे, राजाभाऊ फरांदे, अनिल शिळीमकर, विनोद भाऊ भुजबळ, आदित्य काळे, अमित सालेकर, गुलाब शिंदे, दयानंद सारोळकर यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. राजगडावर प्रज्वलित झालेल्या एका छोट्याशा दीपातून सुरू झालेला हा प्रवास आज चौदा ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे. या प्रत्येक दीपामागे इतिहासाप्रती निष्ठा, राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि माणुसकीचा वैचारिक दिवा अखंड तेवत ठेवण्याचा सरहद परिवाराचा संकल्प आहे!


