नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हॉकी इंडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ बाबूसिंघ नवाब (डिंपल) यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते अरविंद भारतीया तसेच खालसा क्लबच्या माजी खेळाडूंच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरदार गुरमीतसिंघ घडीसाज, प्रा. डॉ. जुझारसिंह सिलेदार, सरदार लोचनसिंघ काटगर, सरदार गुरुदीपसिंघ संधू, ओमप्रकाश मुंदडा, सरदार हरनामसिंघ मल्होत्रा, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, सरदार हरबन्ससिंघ आणि शंकर नंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरदार गुरमीतसिंघ नवाब (डिंपल) यांचे हॉकी क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. अखिल भारतीय श्री गुरु गोविंदसिंघ जी गोल्ड अँड सिल्वर हॉकी स्पर्धेची सुरुवात १९७१ मध्ये झाली. गेल्या २६ वर्षांपासून त्यांच्या अध्यक्षतेखाली शिरोमणी दुष्ट दमन युवक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जात आहे. या स्पर्धेमुळे देशभरातील नामवंत हॉकी संघ व खेळाडूंना नांदेडमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून त्यांनी शहरातील हॉकीची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित खेळाडूंनाही प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते अरविंद भारतीया यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, हॉकी खेळाच्या विकासासाठी डिंपल यांनी अनेक वर्षे सातत्याने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र हॉकी इंडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हॉकीला नवी दिशा मिळेल आणि नवोदित खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना डिंपल नवाब यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. ते म्हणाले की, हा सन्मान केवळ माझा नसून नांदेडच्या हॉकी क्षेत्राचा, खेळाडूंचा आणि गेली अनेक वर्षे या खेळासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि खेळाडूंचे प्रेम यामुळेच हा प्रवास शक्य झाला. महाराष्ट्रातील हॉकीचा विकास, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी आणि नव्या पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


