गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि): वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान मिळावा, या मागणीसाठी २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत जनआंदोलन सुरू आहे. या जनआंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमही सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ३०) अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, वर्ध्याचे खासदार अमर काळे, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. केंद्र सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रसंतांना भारतरत्न सन्मानाची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आगामी काळात जनआंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
केंद्र सरकारच्या वतीने दर तीन वर्षांनी भारतरत्न सन्मानासाठी व्यक्तींची निवड केली जाते. परिणामी, २१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी सुरू करण्यात आलेला जनआंदोलनाचा लढा पुण्यतिथी महोत्सवानंतर अधिक तीव्र करण्याची भूमिका भारतरत्न सन्मान समितीने घेतली आहे. त्यासाठीच पुण्यतिथी महोत्सवात महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रक प्रसारित करण्यात आले. शिवाय, स्वाक्षरी मोहीम आणि येत्या काळात जनआंदोलनाच्या स्थळावरूनच अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळेच राज्यातील नेत्यांनीही जनआंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.
जनआंदोलन स्थळावरूनच वाहिली मौन श्रद्धांजली
मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून गुरुदेव भक्त गुरुकुंज मोझरीत आले होते. दरम्यान, हजारो गुरुदेव भक्तांनी जनआंदोलन स्थळाला भेट दिली असून, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रुपराव वाघ, नागपूरचे श्री गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष अशोक यावले, चिमूरचे मोहितकर गुरुजी यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्तांनी जनआंदोलनाच्या स्थळावरूनच राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहिली.
येत्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकारने राष्ट्रसंतांना भारतरत्न सन्मानाची घोषणा करावी. अन्यथा भारतरत्न मिळेपर्यंत जनआंदोलन सुरूच राहील. या जनआंदोलनात महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्तांनी गुरुकुंज मोझरी येथील जनआंदोलनात सहभागी व्हावे.
– अमर काळे, खासदार, वर्धा
राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. येत्या अधिवेशनात यासंदर्भातील मागणी संसदेत लावून धरणार असून, दिल्लीला राहुल गांधी यांच्याकडे जाऊन आपल्या मागणीचा पाठपुरावा करणार.
– बळवंत वानखडे, खासदार, अमरावती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि समाजप्रबोधनाच्या अमूल्य योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा.
– यशोमती ठाकूर, माजी मंत्री
महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्तांनी या लढ्यात सहभागी व्हावे. हा एकट्याचा लढा नाही. संविधान मानणाऱ्या सर्वांचा हा लढा आहे. या लढ्यात मीसुद्धा सहभागी असून, भविष्यात सक्रिय सहभागी होणार.
– अमोल मिटकरी, माजी आमदार


