नांदेड. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कचऱ्याची वाहतूक करणारे दोन हायवा पकडण्यात आल्याप्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदार अशोक पाल, सहआयुक्त गुलाम सादिक, महापालिकेच्या स्वच्छता विभागातील प्रमुख तसेच इतर जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासून, दोषी असल्याचे पुरावे आढळल्यास त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणात महापालिकेच्या मालकीच्या कचऱ्याची बेकायदेशीर वाहतूक झाली आहे का, याची चौकशी करून चोरी, फसवणूक किंवा अन्य दंडनीय कृत्यांचे पुरावे आढळल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू तरतुदींनुसार गुन्ह्यात योग्य ती कलमे वाढवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. कचरा वाहतुकीचे आदेश कोणी दिले, वाहनांना परवानगी व गेटपास कोणी दिले, याचीही तपासणी करण्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच वजनकाट्याच्या मूळ नोंदी, सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचे जीपीएस रेकॉर्ड, गेटपास, ट्रिपशीट, कंत्राटाची कागदपत्रे आणि कंत्राटदाराला अदा केलेल्या देयकांची तपासणी करावी. एकाच कचऱ्याचे वारंवार वजन दाखविणे, खोट्या नोंदी करणे किंवा चुकीची देयके सादर करून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाली आहे का, हेही तपासावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुन्हा क्रमांक १२०९/२०२६ चा तपास केवळ वाहनचालक किंवा वाहनमालकांपुरता मर्यादित न ठेवता कचरा संकलनापासून विल्हेवाटीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून पुराव्यांनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे नगरसेवकांनी म्हटले आहे.
या निवेदनावर राहुल सोनसळे, ॲड. शेख बिलाल, शेख उम्मे आयमन सय्यद रिजवान, सय्यद शोएब, मोहसीन खान, सुनीता रूपक जोंधळे, सत्यपाल सावंत, महाजाबीन बेगम अब्दुल फहीम, परविन बेगम शेख पाशा, शेख बाबू खोकेवाले, अफिया नाज नाफे काझी, मुन्ना अब्बास हुसेन, ज्योती रमेश गोडबोले आणि हलीमा बी शेख बाबू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


