सरहद परिवार आयोजित…

राजगड दीपोत्सव… एका छोट्याशा संकल्पातून उभी राहिलेली सोळा वर्षांची परंपरा!

आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : राजगड दीपोत्सवाची सुरुवात झाली ती पंधरा वर्षांपूर्वी. यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे. आज मागे वळून पाहताना जाणवते की, वयाच्या अवघ्या २५-२६ व्या वर्षी पाहिलेल्या एका छोट्याशा स्वप्नाने आयुष्यभर पुरतील अशा असंख्य आठवणी दिल्या आणि एका सुंदर परंपरेचा पाया घातला.

त्यावेळी वयाने आम्ही लहान होतो. अनुभव कमी होता, समजही आजच्या तुलनेत कमी होती; परंतु मनात काहीतरी वेगळे करण्याची, मित्रांना एकत्र आणण्याची आणि एक चांगले संघटन उभे करण्याची प्रामाणिक इच्छा होती. याच विचारातून काही मित्र एकत्र आलो आणि चर्चा सुरू झाली. दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस! या दिवशी राजगडावर जायचे, आई पद्मावती मातेच्या मंदिरात दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच आपल्या घरची दिवाळी साजरी करायची, एवढाच साधा आणि सुंदर संकल्प त्यावेळी आम्ही केला होता. आजच्या दृष्टीने पाहिले तर ही तयारी अगदी साधी होती. प्रत्येकाने पन्नास-शंभर रुपये वर्गणी जमा करायची, त्यातून भगवे झेंडे घ्यायचे, गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचे आणि एका गाडीवर दोघांनी बसून राजगडाकडे प्रस्थान करायचे. अशा पद्धतीने आमच्या पहिल्या दीपोत्सवाची सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हातात भगवे झेंडे आणि मनात ओसंडून वाहणारा उत्साह! त्या वयात आम्ही इतर मुलांपेक्षा वेगळे काहीतरी करतो आहोत, आपण धाडसी आहोत, अशी एक वेगळीच भावना मनात असायची. अंगात तरुण रक्त सळसळत होते आणि प्रत्येकाच्या मनात राजगड गाठण्याची ओढ होती.

जयघोष करत आम्ही राजगडाच्या दिशेने निघायचो. आज जिथपर्यंत गाड्या जातात, त्या माळापर्यंत त्यावेळी गाड्या जात नसत. पहिली दोन-तीन वर्षे आम्ही वाजेघर येथे गाड्या लावून तिथून पुढचा प्रवास पायी करायचो.

हातात टेंबे आणि मशाली घेऊन गड चढण्याचा तो अनुभवच काही वेगळा होता. आमच्यातील काही मित्र तर गडावर सर्वांत आधी कोण पोहोचते, याची जणू शर्यतच लावायचे!

त्यावेळी गडाची पायवाट अतिशय खराब होती. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे वाहून आलेले दगड, माती आणि वाटेत तयार झालेल्या मोठमोठ्या घळी यांमधून मार्ग काढत गड चढावा लागायचा. प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागायचे. आज त्या दिवसांची आठवण झाली की, आमच्या जिद्दीचे आणि उत्साहाचे खरोखरच कौतुक वाटते.

त्या काळातील एक गंमतही आठवते. त्यावेळी वन्य प्राण्यांपेक्षा भुताटकीची भीतीच आम्हाला जास्त वाटायची! आज मात्र काळ बदलला आहे; आता भीतीचे स्वरूपही जणू बदलले आहे.

अनेक अडचणी पार करत अखेर गडावर पोहोचलो की, जिथे जागा मिळेल तिथे आडवे व्हायचे आणि थोडा आराम करायचा. त्यानंतर घरून आणलेला डबा उघडून मंदिरातच बसून रात्रीचे जेवण करायचे. मग मित्रांच्या गप्पा, हास्यविनोद आणि दिवसभराच्या प्रवासातील अनुभव यांत रात्र कधी सरायची, हे कळतही नसे. त्यानंतर मंदिरातच झोपायचे.

सकाळी लवकर उठून काही मित्र आंघोळ करायचे, तर काहीजण हात-पाय धुऊन पुढील तयारीला लागायचे. सकाळचे सर्व विधी उरकल्यानंतर…

अगदी पहिल्या वर्षापासून दीदी, म्हणजेच सौ. सुषमा संजय नहार, या अतिशय मनोभावे देवीच्या ओटीसाठी लागणारे साहित्य आणि गडावर तेल घालण्यासाठी तेलाची पिशवी माझ्याकडे सुपूर्द करायच्या. मीही ती श्रद्धेने आणि जबाबदारीने सोबत घेऊन गडावर जायचो.

या छोट्याशा कृतीमागे असलेली त्यांची देवीवरील अपार श्रद्धा, प्रेम आणि राजगड दीपोत्सवाशी जोडलेली भावनिक नाळ आजही माझ्या मनात तितकीच जिवंत आहे. या आठवणी माझ्यासाठी केवळ आठवणी नसून, दीपोत्सवाच्या सोळा वर्षांच्या प्रवासातील मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेला एक अनमोल ठेवा आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वीपासून असलेल्या दिव्यामध्ये तेल ओतून, वात लावून तो दिवा प्रज्वलित केला जायचा. त्यानंतर सोबत आणलेल्या पणत्या लावल्या जायच्या.

आई पद्मावती मातेची ओटी भरली जायची. हार, नारळ अर्पण करून देवीची आरती केली जायची. त्या शांत वातावरणात, श्रद्धेने प्रज्वलित केलेल्या दिव्यांसमोर उभे राहिल्यानंतर मनाला मिळणारे समाधान शब्दांत सांगणे खरोखरच कठीण आहे.

मात्र, आमच्यासाठी हा उपक्रम केवळ देवीच्या मंदिरात दिवा लावण्यापुरता मर्यादित नव्हता. त्या छोट्याशा उपक्रमातून एक चांगले संघटन उभे करण्याचे स्वप्नही आम्ही पाहत होतो.

आरतीनंतर सर्वजण एका रांगेत उभे राहून आपापले विचार मांडायचे. कोण काय काम करतो, या दीपोत्सवासाठी आपले योगदान कशा प्रकारे देता येईल आणि भविष्यात हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर कसा करता येईल, यावर चर्चा व्हायची. प्रत्येकाने पुढील वर्षी आपल्यासोबत आणखी एका मित्राला घेऊन यायचे आणि हा उत्सव अधिक व्यापक करायचा, असा संकल्प आम्ही करायचो.

मला आजही चांगले आठवते, पहिल्या एक-दोन वर्षांत मी फारसे बोलत नसे. मात्र, मनात अनेक विचार होते, काहीतरी मोठे करण्याची इच्छा होती. पुढे मीही अनेक मित्रांना सोबत घेऊन गडावर येऊ लागलो.

त्यावेळी आई पद्मावती मातेच्या मंदिरात मी मनोमन एक शब्द दिला होता — जोपर्यंत हात-पाय साथ देतील आणि आई पद्मावती मातेची कृपा राहील, तोपर्यंत दरवर्षी या दीपोत्सवासाठी गडावर येत राहीन.

आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना मनाला एक वेगळेच समाधान वाटते. आई पद्मावती मातेच्या कृपेने तो शब्द मी आजतागायत प्रामाणिकपणे पाळत आलो आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, परिस्थिती बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या; परंतु राजगडावर जाण्याची ओढ आणि आई पद्मावती मातेच्या चरणी दीप प्रज्वलित करण्याची भावना कायम राहिली.

आमच्या या उपक्रमाची माहिती हळूहळू इतरांपर्यंत पोहोचू लागली. अनेक जण आमचे कौतुक करायचे. त्यातून आम्हाला आणखी प्रेरणा मिळायची.

अशीच एक आठवण आजही मनात घर करून आहे. एका वर्षी वाजेघरच्या ग्रामस्थांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. त्या जेवणाची चव आजही विसरता येत नाही. अननसाचा शिरा, भाजी आणि भात असा साधा; पण प्रेमाने वाढलेला बेत होता. त्या जेवणाने केवळ पोट भरले नव्हते, तर ग्रामस्थांच्या आपुलकीने मनही तृप्त झाले होते. कारण अशा उपक्रमांमध्ये मिळणारे प्रेम, माणुसकी आणि आपलेपणा हीच खरी कमाई असते.

या सुरुवातीच्या प्रवासात शेळीमकर बंधू, नलावडे बंधू, प्रभू कांबळे, भाऊ शिंदे, ऋषी सोंडकर, प्रसाद वाघोलीकर आणि इतर अनेक मित्रबंधूंनी सक्रिय सहभाग घेतला. त्या सर्वांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला सुरुवातीपासूनच एक वेगळी ऊर्जा मिळाली.

काळ पुढे सरकत गेला. प्रत्येकाचे आयुष्य, कामाच्या जबाबदाऱ्या आणि व्यस्तता वाढत गेली. सुरुवातीला हा उपक्रम नियोजित करणारे आणि सहभागी होणारे काही मित्र वेगवेगळ्या कारणांमुळे पुढील वर्षांत नियमितपणे येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या योगदानाची आणि त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण माझ्यासाठी नेहमीच अमूल्य राहील.

त्यानंतर सरहद परिवारातील काही मित्रांची साथ मिळाली आणि या उपक्रमाचा प्रवास अखंडपणे सुरू राहिला. एका छोट्याशा विचारातून सुरू झालेली ही वारी आज सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

खरं सांगायचं तर, राजगड दीपोत्सवाचा हा सुरुवातीचा काळ म्हणजे आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणींचा खजिना आहे. त्या आठवणींमध्ये तरुणपणाचा उत्साह आहे, मित्रांची साथ आहे, सह्याद्रीच्या वाटांवर केलेली धडपड आहे, आई पद्मावती मातेवरील श्रद्धा आहे आणि दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही आहे.

काही प्रवास केवळ अंतर पार करण्यासाठी नसतात; ते माणसांना जोडण्यासाठी, विचारांना दिशा देण्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी असतात. राजगड दीपोत्सव हा माझ्यासाठी असाच एक अविस्मरणीय प्रवास आहे.

राजगड… सह्याद्रीच्या कुशीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा दुर्ग केवळ दगड-मातीचा किल्ला नाही. तो स्वराज्याच्या स्वप्नांचा, पराक्रमाचा, त्यागाचा आणि असंख्य मावळ्यांच्या निष्ठेचा जिवंत वारसा आहे.

या पवित्र भूमीशी जोडले जाणे, गडाच्या सान्निध्यात काही क्षण घालवणे. त्यातून मिळणारे समाधान खूप मोठे आहे.

मात्र, गेल्या १६ वर्षांच्या राजगड दीपोत्सवाच्या प्रवासाने मला यापेक्षाही खूप काही दिले आहे. असंख्य माणसे जोडली, मैत्रीची नाती निर्माण झाली, अनेक अनुभवांची शिदोरी मिळाली आणि एका चांगल्या विचारासाठी एकत्र येण्याचे सामर्थ्य अनुभवता आले.

आज मागे वळून पाहताना जाणवते की, हा प्रवास केवळ दिवे लावण्याचा नव्हता; तर मनामनांत विचारांची ज्योत प्रज्वलित करण्याचा व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर त्यांच्या विचारांशी नतमस्तक होण्याचा दिवस.

काळानुसार या दीपोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले. आज सरहद परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तेरा गडकोटांवर हा दीपोत्सव साजरा केला जातो. एका गडावर प्रज्वलित झालेल्या विचाराची ज्योत आज अनेक ऐतिहासिक गडांपर्यंत पोहोचली आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

सरहद परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय नहार सर यांनी आम्हाला नेहमीच चांगल्या विचारांची शिदोरी दिली आहे. सामाजिक कार्य नेमके कसे असावे, राष्ट्रप्रेम केवळ शब्दांतून नव्हे, तर आपल्या कृतीतून कसे असावे, तसेच सर्व महापुरुषांचे विचार आणि आदर्श आपल्या आचरणातून कसे जिवंत ठेवावेत, हे आम्ही त्यांच्या सहवासातून आणि त्यांच्या कृतिशील कार्यातून शिकलो आहोत.

‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ ही भावना मनामध्ये कायम जागृत ठेवून, कोणतीही अपेक्षा न करता समाजासाठी कार्य करत राहण्याची कर्तव्यनिष्ठा त्यांनी आपल्या कृतीतून जपली आहे. त्यांच्याकडून मिळालेली ही वैचारिक शिदोरीच आज आम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी आणि राजगड दीपोत्सवासारखा उपक्रम सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रेरणा देते.

राष्ट्रप्रेम मनात जपणारे, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कृतीतून सिद्ध करणारे आणि इतरांच्या मनातही देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारे हजारो तरुणांचे मार्गदर्शक मा. संजय नहार सर (भैय्या), तसेच आम्ही ज्यांना आमच्या सरहद परिवाराची माय समजतो त्या सौ. सुषमा संजय नहार (दीदी) यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आहे, याचा मला मनापासून सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा जपत समाजासाठी कार्य करत राहणे, हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी आहे.

संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर सर, अनुज नहार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढे जात आहे. या तेरा गडांवर होणाऱ्या दीपोत्सवाचा मुख्य समन्वयक-उत्सव प्रमुख म्हणून मी, मयूर मसुरकर, माझी जबाबदारी सांभाळत आहे.

या जबाबदारीतून अनेक चांगल्या माणसांशी जोडले जाण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची आणि एका विधायक विचाराचा भाग होण्याची संधी मला मिळाली. ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नसून माझ्या आयुष्यात लाभलेले भाग्य आहे.

आज सरहद परिवाराबरोबर अनेक सामाजिक संघटना, मंडळे, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहे. अनेक हात एकत्र आले की एखादा विचार किती मोठे स्वरूप धारण करू शकतो, याचे राजगड दीपोत्सव हे एक सुंदर उदाहरण आहे.

उत्सवामध्ये सेवाभाव जपणारी माणसे आमच्याशी आयुष्यभरासाठी जोडली गेली.

राजगड दीपोत्सवाच्या प्रवासात अनेक सहकाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने या उपक्रमाला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजगड दीपोत्सवामध्ये देवीचे जागरण-गोंधळ आयोजित केले जाते. मित्रबंधू चंद्रकांत दादा मांगडे यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून या उपक्रमाला एक वेगळी परंपरा लाभली आहे. गेली अनेक वर्षे ते या उत्सवात आपली कर्तव्यनिष्ठा जपत आहेत.

दीपोत्सवासाठी गडावर येणाऱ्या प्रत्येक मावळ्याला भोजन मिळावे, त्याची गैरसोय होऊ नये, या आपुलकीच्या भावनेतून रामनगरी ग्रुपचे मित्रबंधू अनिल शिळीमकर, मनोज पाटील, सुदर्शन डोंगरे आणि मोहन मसुरकर गेल्या अनेक वर्षांपासून वनभोजनाचे आयोजन करत आहेत. त्यांच्या या सेवेमध्ये माणुसकी आणि सहकाऱ्यांविषयीची आत्मीयता दिसून येते.

छावा प्रतिष्ठानचे मित्रबंधू विनोद भाऊ भुजबळ (सातारा) यांच्या वतीने गडावर मर्दानी खेळांचे उत्कृष्ट आयोजन केले जाते. दरवर्षी स्वखर्चाने आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ते या उत्सवात सहभागी होतात. मर्दानी खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडवण्याचे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

मित्रबंधू आदित्य काळे आणि महाराणा प्रताप ढोल पथकाचे योगदानही या उत्सवाचे एक विशेष आकर्षण आहे. डोक्यावर ढोल घेऊन गडाची वाट चढणारे हे तरुण, त्यांचा उत्साह, त्यांचा जोश आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादर होणारे ढोलवादन पाहताना मन अभिमानाने भरून येते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती त्यांच्या मनात असलेली निष्ठा आणि समर्पणभावना पाहून या तरुणांना मनापासून सलाम करावासा वाटतो.

सिद्धी प्रतिष्ठानचे मित्रबंधू राजाभाऊ फरांदे हेदेखील अगदी सुरुवातीच्या काळापासून आमच्यासोबत आहेत. कोणतीही जबाबदारी पडली, तरी ती आनंदाने स्वीकारणे आणि दीपोत्सव अधिकाधिक गडकोटांवर साजरा व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

या सर्व सहकाऱ्यांमुळेच दीपोत्सवाचा विचार केवळ संकल्पनेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे.

तेरा गड… एक विचार… आणि असंख्य जीवाभावाची माणसे या उपक्रमाशी जोडली गेली.

राजगड, तिकोना, प्रतापगड, मल्हारगड, पुरंदर, शिवनेरी, केंजळगड, रायरेश्वर, तोरणा, प्रेमगिरी, सिंहगड, अजिंक्यतारा आणि रोहिडेश्वर या तेरा गडांवर दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.

या गडांवर उत्सवप्रमुख म्हणून अमित सालेकर, गुलाब शिंदे, दयानंद सारोळकर, संदीप कदम, प्रतीक खुटवड, सागर पारखी, बाळासाहेब रुपनर, दत्ता चोरगे, संजय भोईटे, सुधीर खारवे, तानाजी निंबाळकर, अनिल सोनवणे, विनायक पडवळ, बापू रेणुसे, सुनील दिघे, निलेश पवळे, रामचंद्र परदेशी, तुषार फरांदे आणि विठ्ठल पोळ हे सरहद परिवारातील मावळे आपापली जबाबदारी पार पाडत आहेत.

प्रत्येक गडावरील नियोजन, सहभागी मावळ्यांची व्यवस्था आणि उत्सव यशस्वी करण्यासाठी घेतले जाणारे परिश्रम या सर्वांमागे या सहकाऱ्यांची मेहनत आहे.

या उपक्रमामध्ये संस्थेचे विश्वस्त मा. शैलेश वाडेकर सर आणि अनुज नहार सर यांचे मार्गदर्शन, बारकाईने केलेले नियोजन आणि उत्सव यशस्वी व्हावा यासाठी घेतले जाणारे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत. या उपक्रमाचे आधारस्तंभ म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

मला नेहमी वाटते की, एखादा उपक्रम मोठा होतो तो केवळ त्याच्या भव्यतेमुळे नाही; तर त्यामागे निष्ठेने काम करणाऱ्या माणसांमुळे होतो. राजगड दीपोत्सवाने मला या गोष्टीची वारंवार जाणीव करून दिली आहे.

राजगडावरील ती रात्र… आणि आमची अविस्मरणीय आठवण!

या सोळा वर्षांच्या प्रवासात अनेक गंभीर, प्रेरणादायी आणि भावनिक अनुभव आले; पण काही प्रसंग असे आहेत, जे आठवले की आजही चेहऱ्यावर हसू उमटते.

सुरुवातीच्या काळात गडावर मुक्कामासाठी आजच्यासारख्या सोयी उपलब्ध नव्हत्या. मंदिरात जागा नसेल किंवा पुरेशी व्यवस्था नसेल, तर जिथे जागा मिळेल तिथेच रात्र काढावी लागायची.

अशाच एका रात्री आम्ही गडावरील बाहेरच्या अंगणात झोपलो होतो. रात्रीच्या शांततेत अचानक कोणीतरी डोक्याजवळ आल्याची जाणीव झाली. नेमके काय आले असेल, याचा अंदाज येत नव्हता. मनात भीती निर्माण झाली. एखादा वन्य प्राणी तर नसेल ना, अशी शंकाही मनात आली.

आम्ही अंगावरची पांघरुणे काढण्याचीही हिंमत करत नव्हतो. एकमेकांशी अगदी हळू आवाजात बोलत होतो. शेवटी एक युक्ती ठरवली. आपण सगळ्यांनी एक, दोन, तीन असे मोजून एकाच वेळी उठायचे, म्हणजे जे काही असेल ते घाबरून निघून जाईल!

ठरल्याप्रमाणे आम्ही एक, दोन, तीन असे म्हणत सगळे एकदम उठून उभे राहिलो… आणि समोर जे दिसले, ते पाहून आमच्या भीतीची जागा आश्चर्याने घेतली!

अहो, समोर पाहतो तर काय, तो तर चक्क एक कुत्रा होता!

ज्या गोष्टीची भीती मनात धरून आम्ही इतका वेळ दबक्या आवाजात चर्चा करत होतो, त्या गोष्टीचा उलगडा होताच आमचे हसू अनावर झाले. काही क्षणांपूर्वी भीतीने गप्प बसलेलो आम्ही सगळे एकमेकांकडे पाहून हसत होतो.

त्या वेळी भीतीदायक वाटलेली ती रात्र आज आमच्या मैत्रीच्या आणि सहप्रवासाच्या गोड आठवणींपैकी एक झाली आहे.

खरं तर, अशा छोट्या-मोठ्या अनुभवांमुळेच एखादा प्रवास आयुष्यभरासाठी मनात घर करून राहतो. राजगडाने आम्हाला केवळ एक ध्येय दिले नाही, तर मैत्रीची आणि एकत्र जगलेल्या क्षणांची अमूल्य शिदोरीही दिली.

या दीपोत्सवाच्या प्रवासात मला अनेक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले; पण माझ्यासाठी सर्वांत भावनिक आणि अभिमानाचा विषय म्हणजे माझ्या कुटुंबाचे या कार्याशी जोडले जाणे.

माझी मुलगी मृणाल बाल शिवव्याख्याती म्हणून अनेक ठिकाणी तिला उमगलेले छत्रपती शिवराय यांचे विचार मांडण्यासाठी गेली आहे. यंदा राजगड दीपोत्सवात तिचे ९ वे वर्ष आहे. गडावर ती जेव्हा सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती आणि गारद सादर करते, तेव्हा अक्षरशः अंगावर शहारा उभा राहतो.

तिला अगदी लहान वयापासून मी माझ्यासोबत गडावर घेऊन जात आलो आहे. आज ती स्वतः या शिवविचारांशी जोडली गेली आहे, हे पाहताना मनाला विलक्षण समाधान मिळते.

माझी धाकटी मुलगी मृदुल ही देखील या प्रवासात आता सहभागी होते. माझी पत्नी नीलिमा गेली दोन वर्षे माझ्यासोबत गडावर येत आहे. भावाचा मुलगा तन्मय हा देखील या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे.

आपल्या कुटुंबातील माणसेही आपण जपत असलेल्या विचारांवर प्रेम करू लागतात, त्या विचारांना समजून घेतात आणि आनंदाने आपल्या सोबत चालू लागतात, यासारखा दुसरा आनंद कोणता?

गडावर प्रज्वलित केलेली विचारांची ज्योत जेव्हा आपल्या मुलांच्या मनातही शिवविचारांची प्रेरणा जागवते, तेव्हा जाणवते की हा प्रवास केवळ आपल्यापुरता राहिलेला नाही; तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू लागला आहे.

माझ्यासाठी राजगड दीपोत्सवाचे हेच खरे समाधान आहे!

राजगड दीपोत्सवाच्या प्रवासात आलेल्या अनुभवांनी आम्हाला आनंद दिला, प्रेरणा दिली; पण काही प्रसंगांनी महत्त्वाची शिकवणही दिली.

गेल्या वर्षी दीपोत्सवाच्या निमित्ताने राजगडावर अनेक ग्रुप आले होते. त्यापैकी काही जणांनी परफ्युमचा वापर केला आणि ड्रोनही उडवले. त्यानंतर मधमाश्या चिडल्या आणि आमच्या दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू असलेल्या परिसरात घिरट्या घालू लागल्या.

त्या वेळी आमच्या आजूबाजूला ढोलपथकाचे सादरीकरण सुरू होते. काही जण उभे होते, तर काही जण बसलेले होते. मधमाश्या आमच्या अगदी जवळून, खांद्याजवळून आणि आजूबाजूने फिरत होत्या. काही क्षणांसाठी वातावरणात चिंतेचे सावट निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने त्या प्रसंगात कोणालाही मधमाशीने दंश केला नाही.

त्या घटनेनंतर मनात अनेक विचार आले. आपण ज्या सह्याद्रीच्या कुशीत येतो, ज्या गडकोटांना आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अनमोल वारसा मानतो, त्या ठिकाणच्या निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे.

निसर्ग हा केवळ आपल्या आनंदासाठी असलेला परिसर नाही; तो असंख्य जीवांचे घर आहे. मधमाश्या, पक्षी, फुलपाखरे आणि इतर जीवसृष्टी यांच्यामुळेच निसर्गाचे संतुलन टिकून आहे. आपल्या एखाद्या कृतीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

या प्रसंगातून आम्हाला एक महत्त्वाची शिकवण मिळाली. गडावर जाताना केवळ उत्साह आणि आनंद घेऊन जाणे पुरेसे नाही, तर निसर्गाप्रती जबाबदारीची जाणीवही सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.

त्या घटनेनंतर आम्ही आमच्या संपूर्ण टीमसोबत हा अनुभव शेअर केला. सह्याद्रीत फिरताना कोणती काळजी घ्यावी, निसर्गातील जीवांना त्रास होईल अशा कृती कशा टाळाव्यात आणि ऐतिहासिक स्थळांचे पर्यावरण कसे जपावे, याबाबत सर्वांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला.

कारण गडकोटांचा वारसा जपताना केवळ इतिहासाचे नव्हे, तर त्या इतिहासाला साक्षी असलेल्या निसर्गाचेही जतन झाले पाहिजे.

या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—राजगड दीपोत्सवाचे खरे सामर्थ्य त्याच्या आयोजनात किंवा भव्यतेत नाही, तर त्यामागील विचारात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ आठवणींत जपून ठेवायचा नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमानात विधायक कार्य उभे करायचे आहे. तरुण पिढीला आपली संस्कृती, ऐतिहासिक वारसा, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व कळवणे हीच या कार्यातून सेवा आहे.

इतिहासाचे जतन करताना माणुसकीचा विचारही तितक्याच ताकदीने जपला गेला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, समाजात चांगले परिवर्तन घडावे, आपल्या हातून विधायक कार्य व्हावे, नव्या पिढीला सकारात्मक विचारांची दिशा मिळावी आणि या कार्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला व्हावा, हीच या दीपोत्सवामागील खरी भूमिका आहे.

आज तेरा गडांवर प्रज्वलित होणारे हे दीप केवळ प्रकाशाचे प्रतीक नाहीत; ते आपल्या विचारांचे, संस्कृतीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीवरील विश्वासाचे प्रतीक आहेत.

या प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हा दीपोत्सव कोण्या एका व्यक्तीचा नाही, तर एका विचारावर निष्ठा ठेवून एकत्र आलेल्या असंख्य वैचारिक शिवभक्त मावळ्यांचा आहे.

सोळा वर्षांचा हा प्रवास आठवताना मनात समाधानाची भावना निर्माण होते. अनेक सहकारी जोडले गेले, नवीन पिढी या विचारांशी जोडली जात आहे आणि कुटुंबातील माणसेही या प्रवासाचा भाग बनत आहेत.

मला वाटते, एखाद्या उपक्रमाचे खरे यश त्याने किती दिवे लावले यावरच ठरत नाही; तर त्या उपक्रमातून किती माणसे जोडली गेली, किती मनांत चांगले विचार रुजले आणि पुढच्या पिढीला किती प्रेरणा मिळाली, यावरही ठरते.

राजगड दीपोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला हाच वारसा पुढे न्यायचा आहे—इतिहासाचा अभिमान, निसर्गाविषयी आदर, समाजाप्रती बांधिलकी आणि प्रत्येक माणसाला सोबत घेऊन चालण्याची भावना.

मनामनांत प्रज्वलित झालेली विचारांची ज्योत कायम तेवत राहावी, हीच मनापासूनची इच्छा!

कारण राजगड दीपोत्सव हा केवळ एका रात्रीचा उत्सव नाही; तो १६ वर्षांपासून जपलेल्या विचारांचा, नात्यांचा, समर्पणाचा आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेल्या व स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठा जपणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या शौर्याचे, त्यागाचे प्रतीक आहे. तसेच मानवतेच्या, राष्ट्रप्रेमाच्या अखंड प्रवासाचा दीप आहे.

ही वारी आपल्यासारख्या वैचारिक शिवभक्तांमुळे अशीच अखंड चालू राहील.

मयूर मसुरकर
सरहद मुख्य समन्वयक व राजगड दीपोत्सव प्रमुख

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…