पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४७ उमेदवार, तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दोन्ही मतदारसंघांसाठी मिळून १ हजार ५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ७४१, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांची नोंदणी झाली असून, या मतदारांसाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.


