धोकादायक पादचारी पुलावर हजारोंची गर्दी; दुर्घटना टळल्यानंतर आता तरी मनपा जागी होणार का?

 नांदेड,रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : दसरा महल्ला मिरवणुकीत सचखंड श्री हजूर साहिब यांच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा रस्त्यावर उसळलेला महासागर आणि दुसरीकडे हजारो भाविकांची पादचारी पुलावर झालेली गर्दी! त्याच पुलाच्या सुरक्षिततेबाबत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित होत असलेले प्रश्न! अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडली नाही, हे जरी समाधानकारक असले, तरी त्याचे श्रेय प्रशासनाच्या दूरदृष्टीला द्यायचे का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

गुरुद्वारातून निघणारी महल्ला मिरवणूक ही नांदेडच्या धार्मिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाची मिरवणूक मानली जाते. देश-विदेशातून या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. गुरुद्वारा चौकात श्री हजूर साहिब ते नगीनाघाटाकडे जाणाऱ्या लंगर साहिब मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. मात्र, हा पूल तयार झाल्यापासूनच त्याच्या बांधकामावर आणि उपयुक्ततेवर आक्षेप घेतले जात होते. याबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे. त्यानंतर काही वर्षांतच हा पूल वापरासाठी अयोग्य असल्याचे जाहीर करून दोन्ही बाजूंना हा पूल धोकादायक असल्याचे फलक लावण्यात आले. हे फलक लावल्यानंतर आपली जबाबदारी संपली, असा सोयीस्कर अर्थ महापालिका प्रशासनाने लावला.

एवढा मोठा खर्च करून उभारलेला पूल काही वर्षांतच वापरासाठी अयोग्य ठरत असेल, तर त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेची नेमकी जबाबदारी कोणाची? पूल उभारताना ज्या-ज्या यंत्रणांनी मंजुरी दिली, ज्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि ज्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे श्रेय घेतले, त्यांच्याकडे तरी याचे उत्तर आहे का? मंगळवारी झालेल्या दसरा महल्ला मिरवणुकीत या पादचारी पुलाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक पादचारी पुलावर उभे राहिले होते. संपूर्ण पूल गर्दीने खचाखच भरला होता. त्यावेळी भाविकांना पुलावर जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीसही उपस्थित नव्हते. मग गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? पूल खरोखरच वापरासाठी अयोग्य असेल, तर महल्ला मिरवणुकीच्या दिवशी त्यावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती? याची माहिती मिळणेही आवश्यक आहे.

मंगळवारी कोणतीही दुर्घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब असली, तरी एखादी दुर्घटना घडली नाही म्हणून परिस्थिती सुरक्षित होती, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. गर्दीने खचाखच भरलेल्या या पुलाला काही तांत्रिक बिघाड झाला असता किंवा त्याचा एखादा भाग कोसळला असता, तर काय झाले असते? खाली मिरवणुकीत गर्दी आणि वर पुलावरही तितकीच गर्दी! अशा परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी धावपळ झाली असती, चेंगराचेंगरी झाली असती, तर बचावकार्य करणेही अवघड झाले असते. हे प्रश्न केवळ भीती दाखवण्यासाठी नाहीत, तर संभाव्य दुर्घटनेची तीव्रता समजून घेण्यासाठी आहेत. आता तरी महापालिका प्रशासनाने जागे व्हावे आणि या पादचारी उड्डाणपुलाची तज्ज्ञांकडून सुरक्षा तपासणी करून घ्यावी. हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यावरील प्रवेश रोखावा आणि नियमानुसार त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी अपेक्षा भाविकांसह नांदेडकर व्यक्त करत आहेत.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…