नांदेड (प्रतिनिधी) : जपानमध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडच्या भूमिपुत्र आणि पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी रौप्य पदक पटकावत भारताचे नाव उंचावले आहे. गोळाफेक या क्रीडा प्रकारात ८.१९ मीटर अंतरावर गोळाफेक करत त्यांनी दुसरा क्रमांक मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सन २०१७ पासून त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला सुरुवात झाली. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये २५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण ३६ पदके पटकावली आहेत. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
सन २०२१ मध्ये टोकियो आणि २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला. विशेष म्हणजे, पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाच्या ध्वजवाहक होण्याचा बहुमानही भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले असून, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग-१ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जपानमधील आयची-नागोया येथे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत त्यांनी गोळाफेक प्रकारात ८.१९ मीटर अंतराची नोंद करत रौप्य पदक मिळविले. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहेत. या संधीचे सोने करत त्यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भाग्यश्री जाधव म्हणाल्या की, मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सहप्रशिक्षिका पुष्पा मॅडम, प्रशिक्षक प्रशांत वाघ, गुरुबंधू पत्रकार प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर आणि प्रसिद्ध व्यापारी शशिकांत पाटील जुन्ने बेळीकर यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे हे यश मिळवता आले. तसेच डॉक्टर मंडळी आणि प्रसारमाध्यमांतील हितचिंतकांच्या सहकार्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भाग्यश्री जाधव यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


