पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रेखा आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेल्या सुमधुर गीतांची ‘कारवाँ सितारो का’ ही संगीत मैफल ३२व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात दसऱ्याच्या दिवशी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगली. या कार्यक्रमाच्या संयोजिका व प्रमुख गायिका पल्लवी पत्की ढोले, रफी हबीब, विनोद नरवडे, इरफान आणि कविता जवळेकर यांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले.
‘आज की रात’, ‘जाइए आप कहाँ’, ‘आवारा हूँ’, ‘प्यार करने वाले’, ‘सावन का महीना’, ‘चुरा लिया है दिल को’, ‘हवा के साथ साथ’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘ये अपना दिल’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’, ‘छुप गये सारे नजारे’, ‘निगाहें मिलाने को जी’, ‘तेरे जैसा यार कहाँ’, ‘कजरा मोहब्बत वाला’ आणि ‘जय जय संतोषी माता’ अशा अनेक लोकप्रिय गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक गाण्यांना वन्स मोअरही मिळाला. संजय हिवराळे (ऑक्टोपॅड), अमन सय्यद (कीबोर्ड), अमर वानखेडे (कीबोर्ड), सचिन वाघमारे (फ्लूट), मुकेश धोत्रे (लाईव्ह ड्रम), महेश रिसवडकर (गिटार), अंकुश बोर्डे (ढोलक) आणि महेंद्र कुमार (सेक्सोफोन) यांनी वाद्यसंगत केली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी पुणे नवरात्रौ महोत्सवाची सांगता ‘कभी अलविदा ना कहना’ या गीताने केली जाते. यंदाही मंचावरील सर्व कलाकार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रेक्षकांनी एकत्र येत हे गीत गायिले. या भावपूर्ण वातावरणात ३२व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची सांगता झाली. या प्रसंगी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हेमंत बागुल, सागर आरोळे आदी उपस्थित होते.


