नांदेड (विशेष प्रतिनिधी) : काही प्रसंग आणि सोहळे मनाच्या तारा अशा काही छेडतात की शब्दांनाही पाझर फुटतो. स्वकीयांच्या अकस्मात जाण्याने काळजावर झालेली खोल जखम, डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि तरीही दुसऱ्याच्या शरीरात आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्तित्व शोधण्याची उदात्त भावना! अशाच एका अत्यंत भावुक आणि काळजाला भिडणाऱ्या वातावरणाची अनुभूती ‘दाते अमर राहती – एक संवाद, एक प्रेरणा’ या विशेष उपक्रमात आली. दुःखाची अथांग किनार, पाणावलेले डोळे आणि गहिवरून गेलेले अवघे सभागृह अशा मन हेलावणाऱ्या वातावरणात अवयवदानाचे सर्वोच्च मोल पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ हा अवयवदान संकल्प व जनजागृती उपक्रम पार पडला. भोकरच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. अंकुश देवसरकर व डॉ. शुभांगी देवसरकर यांच्या पुढाकारातून या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मरणोत्तर अवयवदान करून दुसऱ्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची नवी किरणे पेरणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पाच कुटुंबांशी संवाद साधून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या भावपूर्ण कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजपा महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजुरकर, महापौर सौ. कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, भाजपा युवती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष शांभवी साले आणि संयोजक डॉ. अंकुश देवसरकर व डॉ. शुभांगी देवसरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी मानवी जीवन, गंभीर आजार आणि अवयव प्रत्यारोपणाची गरज यावर भाष्य केले. आपले अत्यंत जवळचे सहकारी दिवंगत भाऊसाहेब मंडलापूरकर यांना जीवनदान मिळावे म्हणून केलेले शर्थीचे प्रयत्न आणि अखेर नियतीसमोर पत्करावा लागलेला पराभव सांगताना ते स्वतः अत्यंत भावूक झाले. सहकाऱ्यांच्या शारीरिक वेदना आणि त्यांची ती झुंज मांडताना माजी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
पाठोपाठ आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी अवयवदाते आणि अवयव स्वीकारणारे या दोन्ही कुटुंबांमधील भावनिक कल्लोळ उपस्थितांसमोर मांडला. आपल्या सख्ख्या मामांच्या आयुष्यात आलेला प्रसंग आणि सर्व प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता न आल्याची सल व्यक्त करताना त्यांना सभागृहातच अश्रू अनावर झाले. हे दुःख केवळ एका कुटुंबाचे नसून अवयवाअभावी प्राण गमावणाऱ्या हजारो रुग्णांची ही शोकांतिका आहे, असे सांगत त्यांनी अवयवदानाची चळवळ घराघरांत पोहोचवण्याचे कळकळीचे आवाहन केले. तत्पूर्वी डॉ. अंकुश देवसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून व्यापक जनजागृती निर्माण करण्यावर भर दिला.
या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील ब्रेनडेड झालेल्या पाच व्यक्तींच्या कुटुंबीयांनी अत्यंत कठीण प्रसंगात स्वतःचे दुःख बाजूला ठेवून घेतलेला अवयवदानाचा निर्णय उपस्थितांचे डोळे पाणावणारा ठरला. यामध्ये दिवंगत संतोष मोरे यांचे वडील उद्धवराव मोरे, दिवंगत भुजंग मस्के यांचे बंधू संतोष मस्के, दिवंगत दादाराव पवळे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पवळे व सून मनीषा पवळे, दिवंगत सूर्यकांत साधू यांचे बंधू अनंत साधू, तसेच दिवंगत अभिजीत ढोके यांच्या पत्नी प्रिया ढोके यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.


