नांदेड,(प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नांदेड महानगरातील जंगमवाडी भाजपा मंडळातर्फे रविवारी (दि. १८) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. काबरा नगर येथील अंबिका मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आजारांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराचा २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
भाजपाचे महानगराध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार अमरभाऊ राजूरकर, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, महापालिकेच्या महिला व बालकल्याण तथा शिक्षण समितीच्या सभापती सदिच्छा सोनी पाटील, नगरसेविका सविता बिरकुले, प्रवीणभाऊ साले, विजयभाऊ येवणकर, मिलिंदभाऊ देशमुख, नगरसेवक राजू यन्नम, संयोजक नगरसेवक आशिष नेरलकर, पत्रकार संतोष कुलकर्णी आणि लीना गायकवाड यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
नगरसेवक तथा मंडलाध्यक्ष आशिष नेरलकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला शुश्रुत फाउंडेशन आणि हैदराबाद येथील एशियन व्हॅस्क्युलर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. शिबिरात रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, व्हेरिकोज व्हेन्स, पायांच्या रक्तवाहिन्यांमधील गाठी, पायांवरील जखमा आणि मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतींची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, वजन आणि रक्तातील साखरेची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. व्हेरिकोज व्हेन्सच्या तपासणीसाठी हैदराबाद येथील एशियन हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या डॉ. भाग्यश्री रायसोनी आणि चित्रिका वट्टमवार उपस्थित होते. पात्र लाभार्थ्यांना संबंधित आरोग्य योजनांच्या कार्डांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
वेळीच निदान आणि योग्य उपचारांवर भर
अनेकदा नागरिक किरकोळ वाटणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, आजार बळावल्यानंतर उपचार घेण्याची वेळ येते. ही परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी करून घेता यावी, आजारांचे लवकर निदान व्हावे आणि योग्य उपचारांची दिशा मिळावी, हा शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. शिबिराच्या यशस्वितेसाठी सदाशिव कल्याणकर, प्रवीण कुलकर्णी, जयेश कुलकर्णी, जनार्दन वाकोडीकर, अमोल चौधरी, अनिल डोईफोडे आणि संकेत बोल्लावार यांनी परिश्रम घेतले.


