अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शोभा सर्वोदय फाउंडेशन व दिव्यदृष्टी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्हाइट केन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मुकुल गंधे यांचा सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजातील विविध घटकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोबल वाढविणे आणि सामाजिक उपक्रमांचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुकुल गंधे यांनी कार्यकर्ता म्हणून पुढाकार घेतला. विशेषतः विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्श (SPARSH) योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या उपक्रमात सूरज अग्रवाल, दिनेश परदेशी व श्रीकांत नांदापूरकर यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला धनश्रीताई विखे पाटील, ब्रिगेडियर राजीव चावला, वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, बँक ऑफ बडोदाचे रिजनल हेड मनीष कुमार आणि डीवायएसपी शिरीष वमने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुकुल गंधे यांचे अभिनंदन करण्यात आले.


