तिवसा तालुक्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर!

काटसूर, वणी-सुलतानपूर पुलांच्या बांधकामासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम; वंचित बहुजन युवा आघाडीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यातील काटसूर आणि वणी-सुलतानपूर येथील नादुरुस्त पुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या दोन्ही पुलांचे तातडीने बांधकाम करावे, तसेच तालुक्यातील खचण्याच्या अवस्थेत असलेल्या सर्व पुलांचे सुरक्षा ऑडिट करून प्राधान्याने दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास ग्रामस्थांसह नादुरुस्त पुलावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काटसूरच्या पुलावर मोठमोठे खड्डे; कठडेही गायब

तिवसा तालुक्यातील काटसूर गावाला जोडणारा पूल गेल्या दोन वर्षांपासून खचण्याच्या अवस्थेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरू शकते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुलाचे तातडीने बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वणी-सुलतानपूर मार्गावरील पूल पूर्णपणे खचला

वणी येथून सुलतानपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल पूर्णपणे खचल्याचे निवेदनात म्हटले आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना पुलाचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. अवजड वाहनांची ये-जा सुरू राहिल्यास रस्त्याचे आणखी नुकसान होऊन दोन्ही गावांचा संपर्क तुटण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणारे दुचाकीस्वार, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा आरोप

या दोन्ही पुलांच्या दुरवस्थेकडे माजी तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सागर भवते यांनी निवेदनातून केला आहे. यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रांतून पुलांच्या समस्येबाबत बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असून, संभाव्य दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. काटसूर आणि वणी-सुलतानपूर येथील पुलांचे तातडीने बांधकाम करण्यासोबतच तिवसा तालुक्यातील सर्व धोकादायक पुलांचे सुरक्षा ऑडिट करून आवश्यक निधी उपलब्ध करावा आणि प्राधान्याने पुनर्बांधणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आठ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन!

प्रशासनाने आठ दिवसांच्या आत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित नादुरुस्त पुलावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिला आहे. आता बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना सागर भवते, उपसरपंच सिद्धार्थ कटारणे, विनोद खाकसे, नितीन थोरात, अमोल जवंजाळ, आशिष भगत, शैलेश बागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…