अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव ॲड. अनिल ढुमणे आणि सह-उद्योग प्रभारी श्रीमती शर्मिला पाटील यांची आंतरराष्ट्रीय कामगार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली असून, ते थायलंडची राजधानी बँकॉक येथे रवाना झाले आहेत. दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणात ते भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ILO-ITC आणि JILAF यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात दूरस्थ कामाच्या संदर्भातील रोजगार व औद्योगिक संबंध, तसेच मानवी हक्कविषयक योग्य दक्षता, सामाजिक संवाद आणि जीवननिर्वाहयोग्य वेतन यांच्या आधारे कामगार संघटनांच्या रणनीतीचे नूतनीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी दि. २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या निवडक प्रतिनिधींना बँकॉक येथील प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आली असून, भारतीय मजदूर संघाच्या दोन प्रतिनिधींची निवड झाली आहे.
ॲड. अनिल ढुमणे हे पूर्णवेळ कार्यकर्ते असून, अखिल भारतीय सचिव म्हणून राष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या प्रश्नांवर कार्यरत आहेत. विविध उद्योगांतील वेतनवाढ करार, कामगार आंदोलने, कायदेशीर बाबी आणि लेबर कोडसंदर्भातील धोरणात्मक अभ्यासाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. श्रीमती शर्मिला पाटील या महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात कार्यरत होत्या. नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या पाटील यांनी कामगार महासंघाच्या पदाधिकारी म्हणून वेतनवाढीच्या वाटाघाटी, कामगार आंदोलने, महिला कामगारांचे प्रश्न आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
बदलत्या रोजगार व्यवस्थेत कामगारांचे हक्क, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक संवाद आणि न्याय्य वेतन हे मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध देशांतील कामगार संघटनांच्या अनुभवांची आणि कार्यपद्धतींची देवाणघेवाण होणार असून, त्याचा उपयोग भारतीय कामगार चळवळीची रणनीती अधिक प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो. या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी भारतीय मजदूर संघाच्या दोन प्रतिनिधींची झालेली निवड ही संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. या संदर्भातील माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव कृष्णा साठे यांनी दिली.


