पुणे, आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र): हडपसर येथील मगरपट्टा सिटीस्थित श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. उत्सवाच्या औचित्याने मगर कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणून आज ३०० हून अधिक महिलांच्या सहभागातून सामूहिक कुंकू अर्चन आणि सामूहिक श्रीसूक्त हवन मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या धार्मिक विधीमध्ये अनेक सुवासिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्री महालक्ष्मी देवीचे पूजन केले व कृपाशीर्वाद प्राप्त केला. सर्व भाविकांनी व सद्धर्मप्रेमी सज्जनांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेदशास्त्री जोशी गुरुजी यांनी केले आहे.


