मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधी) : विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युगपुरुष, स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवात सामुदायिक ध्यान, प्रार्थना, ग्रामसफाई, ग्रामगीता प्रवचन, वारकरी कीर्तन संमेलन, खंजिरी भजन, अभंग गायन, महिला संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध विधायक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे. महोत्सवातील सर्वांत भावस्पर्शी कार्यक्रम असलेली मौन श्रद्धांजली ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करत समाजात मानवता, बंधुता, सेवा आणि ग्रामविकासाची भावना रुजविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. विविध धार्मिक संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून गुरुदेव भक्तांमध्ये सुरू असलेली चर्चा आणि अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या भूमिकेबाबतचे प्रश्न यंदाच्या महोत्सवात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
२४ ऑक्टोबरला महासमाधी पूजनाने प्रारंभ
शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता तीर्थस्थापना व राष्ट्रसंतांच्या महासमाधी पूजनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. सामुदायिक ध्यानानंतर महाद्वारावर ध्वजारोहण करण्यात येणार असून, गुरुकुंज आश्रम व गुरुदेवनगर परिसरातून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेचे संचालन मानकर स्वामी (आळंदी) करणार आहेत. सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेवर अंकुश घोगरे चिंतन मांडतील. रात्री पुरुषोत्तम दाते व श्रीगुरुदेव बाल भजन मंडळ, पवनार यांचे खंजिरी भजन, तसेच ज्योती शेलोटकर यांचे कीर्तन होईल.
वक्तृत्व स्पर्धा, योगाभ्यास आणि ग्रामगीतेचा जागर
२५ ऑक्टोबर रोजी सामुदायिक ध्यानावर राजू डांगे चिंतन व्यक्त करतील. दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत तुलसीदास कपाळे, अक्षय धानोरकर व डॉ. मनीषा अमृतकर योगासन आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. सकाळी ८ ते ९ या वेळेत ग्रामगीता प्रवचन होणार आहे. या दिवशी श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री श्रीगुरुदेव भजन मंडळ, मोतीनगर-अमरावती यांचे खंजिरी भजन, तसेच प्रकाश मांगे व श्रीजयनाथ चव्हाण यांचे कीर्तन होईल.
२६ ऑक्टोबरला महिला संमेलन
सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुष्पाताई बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे मार्गदर्शन करतील. आरती वानखडे, वैशाली धुमोणे, पौर्णिमाताई सवाई, गौरी देशमुख, शीतल डोंगरे व शुभांगी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर आचार्य पदवी प्राप्त केलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. रात्री श्रीगुरु माऊली महिला भजन मंडळ, काटोल यांचे खंजिरी भजन, निळकंठ गायकी यांचे भक्तिसंगीत आणि बाल कीर्तनकार कृष्णाई लांजूळकर हिचे कीर्तन होईल.
वारकरी कीर्तन संमेलनातून भक्तिरसाची पर्वणी
२७ व २८ ऑक्टोबर रोजी श्रीगुरुदेव वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी चंदेले नाना यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, लक्ष्मणदास काळे महाराज अध्यक्षस्थानी राहतील. उमेश बारापात्रे यांचे अभंग गायन, विविध कीर्तनकारांची कीर्तने आणि भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी संमेलनाचा उर्वरित कार्यक्रम सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. सायंकाळी डॉ. अरविंद देशमुख सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करतील. त्यानंतर राजेश उमाळे यांची भजनसंध्या, परभणीचे कवी इंद्रजित भालेराव यांचा ‘गावाकडे चल माह्या दोस्ता’ हा कार्यक्रम आणि गौरी महाराज सांगळे यांचे शिवचरित्र सादरीकरण होणार आहे.
२९ ऑक्टोबरला ग्रामगीताचार्य पदवीदान
२९ ऑक्टोबर रोजी सकाळी वारकरी कीर्तन संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम होईल. सर्वाधिकारी प्रकाश वाघ अध्यक्षस्थानी राहणार असून, सचिन पवार, कैलास महाराज चव्हाण, संदीप महाराज गिन्हे, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख गोपाल कडू व लक्ष्मण गमे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सचिन पवार यांचे सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन, शुभम ठाकूर (हिमाचल) यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि डॉ. प्रशांत ठाकरे व शुकदास गाडेकर यांचे कीर्तन होईल.
३० ऑक्टोबरला मौन श्रद्धांजलीचा भावस्पर्शी सोहळा
शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ता संमेलन, सत्कार व पुरस्कार वितरण होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत समर्थ आडकोजी महाराज संस्थान, वरखेड, जन्मभूमी यावली आणि तपोभूमी गोंदोडा येथून येणाऱ्या पालख्यांचे सेवामंडळाच्या वतीने स्वागत व पूजन करण्यात येईल. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना, महाआरती, राष्ट्रवंदन आणि सामुदायिक प्रार्थना होईल. रात्री स्वरगुरुकुंजाचे खंजिरी भजन, विशाल महाराज खोले यांचे कीर्तन आणि ‘माणुसकीचा ध्यास’ या संकल्पनेवर आधारित पं. भीमराव पांचाळे व भाग्यश्री पांचाळे यांचा गजल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री लक्ष्मणदास काळे यांच्या कीर्तनाने दिवसाची सांगता होईल.
३१ ऑक्टोबरला पालखी प्रदक्षिणा व गोपालकाला
शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४० ते १० या वेळेत विविध गावांतून आलेल्या पालख्या व दिंड्यांची महासमाधी, मोझरी, गुरुदेवनगर आणि रामकृष्णहरि मंदिर या मार्गावरून पालखी प्रदक्षिणा होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत गोपालकाला व समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत व्यायाम संमेलन आयोजित करण्यात आले असून, डॉ. माधुरीताई चेंडके व क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन व आभार प्रदर्शन करतील. रात्री खंजिरी भजनाच्या कार्यक्रमाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या विविध समित्या कार्यरत आहेत. पत्रकार परिषदेला सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख गोपाल कडू व आध्यात्म विभागप्रमुख डॉ. राजाराम बोथे उपस्थित होते.
भारतरत्नच्या मागणीवर गुरुदेव सेवामंडळाची चुप्पी; महोत्सवात भूमिका स्पष्ट होणार?
आंदोलन, उपोषणांनंतरही अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा; लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची शक्यता
श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून गुरुदेव भक्तांकडून विविध आंदोलने व उपोषणे करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक नेते आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन या मागणीचा पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, या मागणीवर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी गुरुदेव भक्तांकडून होत आहे.
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला ग्रामविकास, समता, बंधुता, स्वावलंबन आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत सेवामंडळाची भूमिका काय राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतरत्नच्या मागणीला मंडळ अधिकृत पाठिंबा देणार का? शासनदरबारी पाठपुरावा करणार का? तसेच या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये मंडळ सहभागी का झाले नाही, याबाबत स्पष्टीकरण मिळणार का, असे प्रश्न भक्तांकडून विचारले जात आहेत.
२४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महोत्सवात त्यांना भारतरत्नच्या मागणीबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात सेवामंडळ भारतरत्नच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करणार का, याकडे गुरुदेव भक्तांचे लक्ष लागले आहे.


