नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधि): बिरसा मुंडा स्टडी सेंटर, नागपूर यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम शिवाजी नगर नागरिक मंडळ सभागृह येथे उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांनी ‘प्रशासकीय सेवेमधील निर्णय प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. आदिवासी युवकांनी शिक्षण, प्रशासकीय सेवा, निर्णयप्रक्रिया व धोरणनिर्मितीत सक्रिय सहभागासाठी सातत्यपूर्ण तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. रायान घोडाम, लेखक व वक्ते यांनी ‘आदिवासी युवा नेतृत्व’ या विषयावर मार्गदर्शन करत युवकांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून समाजाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवांसाठी नियोजनबद्ध तयारी करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. समारोपानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. भारत मडावी, आर्यन धुर्वे, हर्ष भलावी, उज्वल सोयाम, संतोष दूर्वा, डॉ. संदीप मसराम, प्रिया मरसकोल्हे, जयंत मडावी, अजय जुमनाके, नेहा कुलसंगे, सचिन बोरकुटे, सिरिष गावडे, बादल गावडे तसेच प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.


