नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी अनेकदा मदत केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांनी मनमानी कारभार करत चुकीच्या पद्धतीने एसआयआर मोहीम राबवली असून, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
एसआयआर रद्द करा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या तसेच ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीपीआय, आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या मोर्चात खासदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हणमंत पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, सुरेशदादा गायकवाड, प्रा. यशपाल भिंगे, तिरुपती पाटील कोंडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बार्शी व भुजंग पाटील, तालुकाप्रमुख सुनील कदम, कामगार नेते कॉम्रेड प्रदीप नागापूरकर, सतीश पाटील उमरेकर, नगरसेवक मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, पाशाभाई, शोएब हुसेन आदींसह इंडिया आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


