नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न तसेच पोलीस ठाणे आणि विविध पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नुकतीच भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा केली.
नांदेड शहरातील जुनी व जीर्ण झालेली पोलीस निवासस्थाने आधुनिक सुविधांसह पुनर्विकसित करण्यात यावीत, अशी मागणी गोपछडे यांनी केली होती. यात स्नेहनगर येथील ७५५ शासकीय निवासस्थानांचा पुनर्विकास तसेच नांदेड पोलीस मुख्यालयातील १५ इमारतींचा पुनर्विकास आणि वजीराबाद वाहतूक पोलीस शाखेसाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे प्रलंबित आहे. स्नेहनगर पुनर्विकास प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, सौरऊर्जा, स्मार्ट पार्किंग आणि इंटरनेट सुविधांसह बालवाडी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, पोलीस चौकी, एटीएम सेंटर, सामुदायिक सभागृह आणि मनोरंजनासाठी मोकळ्या जागा अशा विविध सुविधांचा प्रस्ताव आहे.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता आणि आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचा पाठपुरावा सुरू आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या प्रस्तावांच्या कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


