नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी): साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे ‘रंगकृती’ आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २० शाळांमधील १४२ विद्यार्थ्यांनी रंगभरण, कोलाज निर्मिती आणि मातीशिल्प अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपले कलागुण सादर केले.
साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष टी. के. व्यंकटेश यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सोसायटीचे सहसचिव डॉ. सुरेश चारी, कोषाध्यक्ष आर. गणेश, पूर्व प्राथमिक विभागाचे अध्यक्ष जे. राधाकृष्णन तसेच सोसायटीचे इतर सदस्य उपस्थित होते. सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेश्मी उमेश आणि समन्वयक एस. प्रभुरामन यांचीही उपस्थिती होती. नर्सरीच्या रंगभरण स्पर्धेत सोमलवार निकळस स्कूलची कु. श्रिशा रापर्टवार हिने प्रथम, आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूलची कु. कुंजल ठाकरे हिने द्वितीय, तर सरस्वती विद्यालयाची कु. धन्वी उगले हिने तृतीय क्रमांक मिळविला. केजी-१च्या कोलाज निर्मिती स्पर्धेत व्हेरोनिका प्री-प्रायमरी स्कूलची कु. कियारा बधेल प्रथम, सेंट उर्सुला स्कूलची कु. सिद्रा अहमद द्वितीय आणि व्हेरोनिका प्री-प्रायमरी स्कूलची कु. दृधा राऊत तृतीय ठरली.
केजी-२च्या मातीशिल्प स्पर्धेत उडान प्री-स्कूलची कु. ओजस्वी धांडे हिने प्रथम, सीडीएस स्कूलची कु. जिया बोंद्रे हिने द्वितीय, तर व्हेरोनिका प्री-प्रायमरी स्कूलची कु. अक्षिता जिकार हिने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी ईसीसीईच्या विद्यार्थ्यांनी कठपुतळी शो आणि लघुनाटिका सादर केली. पर्यवेक्षिका वीणा नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


