नांदेड ,रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा संघटनात्मक निर्णय घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी माजी आमदार सुनील राणे आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.
नांदेड महापालिकेच्या नूतन नगरसेविका शांभवी प्रवीण साले यांची या कार्यकारिणीत ‘राज्य युवती प्रमुख’पदी निवड करण्यात आली आहे. राज्यातील युवकांचे संघटन मजबूत करण्यासोबतच तरुणींच्या प्रश्नांवर भाजयुमोच्या माध्यमातून आवाज उठवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीत ३५ वर्षांच्या आतील युवक-युवतींना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने तरुणाईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकारिणीत विक्रम जैन, मयूर दौंडकर, भावार्थ दौंड, शुभम जायभाय, मयूर वंजारी, सौरभ चव्हाण, वैभव वायचल, अंकुश ठाकूर, सौरभ मुंडलिक यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बादल राऊत, सुदर्शन यादव, तेजस्विनी दुर्गे आणि दत्तप्रसाद जाधव यांची महामंत्रीपदी, तर अनिमेष कुलकर्णी, अद्वैत कुलकर्णी, आम्ही विश्वरूप, राजू चव्हाण, राहुल नरोटे, योगेश चांदवडकर, जयेश बुगड, अतुल जैन, ॲड. मिलिंद नांदगावकर आणि ॲड. बाळकृष्ण कायपेलवार यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वीरेंद्र ठाकूर यांची कोषाध्यक्षपदी, यश सातपुते यांची सहकोषाध्यक्षपदी, यश तायडे यांची कार्यालय प्रमुखपदी आणि प्रदीप सकपाळ यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आता लवकरच जिल्हा आणि तालुका स्तरावरील भाजयुमोच्या नवीन कार्यकारिण्याही जाहीर होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात युवा मोर्चाची भूमिका अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.


