पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून राज्यातील १२५ बसस्थानकांवर अत्याधुनिक ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. मात्र, यापूर्वी उभारण्यात आलेल्या कक्षांची देखभाल आणि प्रत्यक्ष वापराचा प्रश्न कायम असल्याने नव्या कक्षांबरोबर जुन्या सुविधांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागात मागील आठवड्यात हिरकणी कक्षांचा आढावा घेण्यात आला.
पुढील तीन आर्थिक वर्षांत १२५ कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये ५० आणि २०२८-२९ मध्ये २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत. सुमारे ३ बाय ३ मीटर आकाराचे हे कक्ष प्री-फॅब्रिकेटेड स्वरूपाचे असतील. त्यामध्ये आवश्यक फर्निचर, वीज, इलेक्ट्रॉनिक सुविधा आणि खासगी जागेची व्यवस्था असणार आहे. कक्षासाठी जागा, वीज-पाणी आणि आवश्यक परवानग्यांसाठी एसटी महामंडळ सहकार्य करणार आहे. कक्ष हस्तांतरित झाल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी महामंडळाची असणार आहे.
पुण्यात शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक आणि स्वारगेट या प्रमुख एसटी स्थानकांवर हिरकणी कक्ष आहेत. तसेच, जिल्ह्यातील प्रमुख १७ स्थानकांवर कक्ष असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कक्षांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष वापर याबाबत आढावा घेण्यात आला आहे. मात्र, छोट्या एसटी स्थानकांमधील हिरकणी कक्षांचा प्रश्न अद्याप कायम आहे. नवीन कक्ष उभारल्यानंतर त्यांची देखभाल, सुरक्षा, दुरुस्ती आणि नियमित पाहणीची जबाबदारी एसटी महामंडळाची राहणार आहे. त्यामुळे केवळ कक्ष उभारण्यापेक्षा ते स्वच्छ, सुरक्षित आणि महिलांसाठी प्रत्यक्ष वापरायोग्य ठेवण्याचे आव्हान महामंडळासमोर राहणार आहे. जुन्या कक्षांची स्थिती पाहता नव्या सुविधांच्या देखभालीकडेही लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.


