नांदेड, रवींद्र औंढेकर (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या एकूण १० मोटारसायकली, अंदाजे ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देगलूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही इसम नायगाव व परिसरातून कमी किमतीत चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी खानापूर येथे येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलीस उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट यांच्या आदेशानुसार देगलूर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे व त्यांच्या पथकाने खानापूर फाटा येथे सापळा रचला.
आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून आरोपींकडे पाठविले. रात्रीच्या सुमारास वन्नाळी रोडने दोन इसम एका बाभळीच्या झाडाजवळ मोटारसायकलीसह आले. बनावट ग्राहकासोबत चोरीच्या मोटारसायकलीच्या खरेदी-विक्रीबाबत चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी अचानक घेराव घालून कारवाई केली. यावेळी अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला, तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवकुमार हनमंत कुन्हाडे (वय २८, रा. बेगळे नगर, नायगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) आहे. फरार आरोपी तुकाराम उर्फ बाळू गंगाधर गिरी (वय २५, रा. टाकळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली असता, त्याने एमआयडीसी परिसरासह इतर ठिकाणी लपवून ठेवलेल्या चोरीच्या मोटारसायकलींबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन १० मोटारसायकली जप्त केल्या. यापैकी एक मोटारसायकल देगलूर पोलीस ठाणे गु.र.नं. ४८७/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये, तर एक मोटारसायकल कंधार पोलीस ठाणे गु.र.नं. ३७३/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस करीत आहेत.


