अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी ) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार मुकुल वासनिक आणि AICCचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांनी प्रा. अदिती पोहरे यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे अमरावती विभागातील काँग्रेसच्या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाची पुन्हा ठळक छाप
अमरावती जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आ. यशोमती ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. विशेषतः आगामी स्थानिक तसेच विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील संघटनात्मक हालचालींना त्यांनी गती दिली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. अदिती पोहरे यांचा काँग्रेस प्रवेश झाल्याने शिक्षक मतदारसंघाच्या राजकारणात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची नवी बांधणी
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच विविध पक्ष, संघटना आणि इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या प्रा. अदिती पोहरे यांचा काँग्रेस प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा राजकीय घटनाक्रम ठरला आहे. शिक्षकांच्या वेतन, सेवाशर्ती, पदोन्नती, पेन्शन, अनुदान, रिक्त पदे, शैक्षणिक धोरणे तसेच विविध प्रशासकीय प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याची गरज शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जाते.
राजकीय वारसा अन् शिक्षण क्षेत्राचा अनुभव
प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे या माजी कृषिमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचवेळी शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची ओळख उच्चशिक्षित प्राध्यापक म्हणूनही आहे. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. मानसशास्त्र हे शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. त्यापूर्वी त्यांनी बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे.
२०१० पासून अध्यापन व संशोधन क्षेत्रात
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला येथे प्रा. पोहरे २०१० पासून पदव्युत्तर स्तरावर अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. भूकंप अभियांत्रिकी विषयासह विविध संशोधन प्रकल्प आणि एम.ई. स्तरावरील शोधप्रबंधांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अध्यापन, संशोधन, सामाजिक कार्य आणि राजकीय पार्श्वभूमी या विविध क्षेत्रांचा अनुभव त्यांच्या कार्याला वेगळी दिशा देतो. महिलांच्या ‘मनस्विनी’ व्यासपीठाच्या संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
काँग्रेसच्या गोटात उत्साह
प्रा. अदिती पोहरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे अमरावती विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने काँग्रेसच्या पुढील राजकीय हालचालींकडे लक्ष लागले आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा पक्षप्रवेश शिक्षक मतदारसंघाच्या आगामी राजकीय लढतीसाठी काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीतील एक महत्त्वाचा घटनाक्रम ठरला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेश नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे अमरावती विभागातील काँग्रेसच्या आगामी राजकीय हालचालींबाबत उत्सुकता वाढली आहे.


