पुणे जिल्हा ,राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वच्छ आणि सुंदर पुणे अशी ओळख असलेल्या शहरातील पदचारी उड्डाण पुलावर कचऱ्याचे आणि मद्याच्या बाटल्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पदचारी उड्डाण पुलाचा वापर कमी होताना दिसत आहे.
शहरात येणाऱ्या मुख्य सातारा हायवेवरील रस्त्यावर नागरिकांच्या सेवेसाठी पदचारी उड्डाण पुलाची सोय करण्यात आली आहे. मात्र, याच उड्डाण पुलावर मद्यपान केलेल्या बाटल्या तसेच कचऱ्याचे ढिग साचलेले दिसून येतात. उड्डाण पुलापासून काही मीटर अंतरावर महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे. असे असतानाही या प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या प्रकाराला कधी आळा बसेल आणि हा पदचारी उड्डाणपूल नागरिकांच्या वापरासाठी स्वच्छ कधी पाहायला मिळेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


